नऊ महिन्यांची गरोदर ती. स्टेजवर आली. नाचली. रसिकांची मने जिंकली. पाच मिनिटांसाठी सहकारी कलावंतांकडे स्टेज सुपूर्द केला. ती आपल्या पडद्यामागच्या पालात गेली. काही वेळानंतर पुन्हा स्टेजवर आली. तेव्हा ती गरभार नव्हती. स्वत:च स्वत:चे बाळंतपण करून पुन्हा लावणी करण्यासाठी सज्ज झाली.. ही गोष्ट आहे तमाशाची राणी, लावणीसम्राज्ञी ‘विठाबाई’ची!
राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुरुवारी नागपूरच्या अंकुर मानव समाज उत्थान केंद्राने संजय जीवने लिखित आणि दिग्दर्शित लावणीसम्राज्ञी ‘विठाबाई’चे आयुष्य रंगमंचावर जिवंत करताना हा प्रसंग रसिकांसमोर पेश केला आणि रसिकांनी उत्तुंग दाद देत विठाबाईच्या थक्क करणाऱ्या आयुष्याला सलाम केला.
भारत–चीन युद्धाच्या वेळी सैनिकांचे मनोबल वाढवणाऱ्या आणि राष्ट्रपतींच्या हस्ते लोककलावंत म्हणून गौरव झालेल्या या लोकप्रिय कलावंतीनच्या आयुष्यात भिक मागण्याची वेळ आली. तिच्या वाटय़ाला हे हलाकीचे जिणे का यावे, याची गोष्ट ‘विठाबाई’च्या स्वकथनातून पुढे जाणारे नाटक ठसकेबाज लावणीसह तिच्या पडद्यामागच्या जगण्याचे वास्तवही सांगून गेले.
निवेदन करणाऱ्या विठाबाईची भूमिका वंदना जीवने यांनी साकारली तर ११ र्वष वयापासून तमाशाचे फड गाजवणाऱ्या विठाबाईची भूमिका सांची जीवनेने आपल्या अभिनय सामर्थ्यांच्या बळावर जिवंत केली. उत्तम संवादकौशल्य, रंगमंचावर सहज वावर आणि लावणीचे उत्तम सादरीकरण करत सांचीने ‘विठाबाई’च्या भूमिकेला यथोचित न्याय दिला.
या नाटकाचा सारा डोलारा वाद्यवृंदावर आधारित होता.सोनाली बोहरपी–जावळे यांनी या वाद्यवृंदाचे नेतृत्व करीत त्यांनी गायलेल्या लावण्यांनी या नाटकाला प्रभावी केले. मनोज कुकवास यांनी हामोनियमची तर कांचन घाटोळे यांच्या हलगीने ठेका धरायला लावला. भूषण जाधव,मोनिका भोयर, धीरज ढोके यांच्या साथसंगत मोलाची ठरली.
विठाबाईच्या भूमिकेसह संजय जीवने (विठाबाईचे बाबा), ललित गायकवाड(विठाचा भाऊ), रोशन श्रीवास्तव (सावळा व मावशी), रूपाली कांबळे(शालन), अभिजित मून (र्मचट), मिलिंद कोटंबे (हुमणे), अनुप तेलंग(म्हातारा), हरीश गवई (तरुण), भूषण जाधव (व्यक्ती), संदीप मून(सैनिक), उज्ज्वल भगत (नेता), अनिकेत कांबळे (कार्यकर्ता), सदिच्छा जिलटे (मेनका), लुंबिनी आवळे (राधिका), गौरी सोनटक्के (गोपिका,कलावंतीन, केशर), रितिका बावने (चंद्रिका), अभिलाष बागडे(कॉन्ट्रॅक्टर मेश्राम), शुभम गाडगीलवार (नत्थुजी जाधव), आर्यन सोनवणे, सोहम माने (बालकलाकार) यांनी छोटय़ा–मोठय़ा भूमिका साकारून ‘विठाबाई’चा जीवनपट रसिकांपर्यंत पोहोचवण्यात मोलाची मदत केली.
मिथून मित्रा यांची प्रकाशयोजना, सुरेंद्र आवळे याचे नेपथ्य, बाबा खिरेकर यांची रंगभूषा आणि प्रिती तुपे यांची वेशभूषा नाटकाला प्रभावीपणे सादर करण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या. नृत्य–दिग्दर्शन रोशन श्रीवास्तव यांचे होते.