रामविजय परब लिखित आणि गजानन चव्हाण दिग्दर्शित ‘हार्दिक आमंत्रण’मध्ये मानवी मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांचा हिशेब मांडण्यात आला. नकळत झालेल्या चुका माणूस मनाच्या चोरकप्प्यात लपवून ठेवत असतो.त्याच्या ओझ्याखालीच वावरत असला, तरी त्यावर आवरण घालतो. अशाच आवरण घालून वावरणाऱ्या एका महिलेच्या आयुष्याची गोष्ट तिच्याकडून झालेल्या चुकांची बेरीज–वजाबाकी करत सांगण्यात आली.
राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाचवे पुष्प मुंबईच्या बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या ‘हार्दिक आमंत्रण’ने गुंफले गेले. या नाटकाने चित्र आणि शिल्पांची सोबत घेऊन माणसाच्या मनातील बदलणाऱ्या भावभावनांची उकल केली.
या प्रयोगात महत्त्वाची भूमिका होती ती कविताची. अर्थात चुका लपवून ठेवत वावरणाऱ्या महिलेची. संपूर्ण नाटक घडणाऱ्या कलादालनात कविताच्या जगण्यातले वेगवेगळे रंग सहजपणे चितारले जातात.तिच्या या जीवनरंगाचा प्रवास क्षणोक्षणी बदलत जातो. स्वत:भोवती पांघरलेले अनेक रंग गळून पडतात. नवे रंग जन्म घेतात. त्या रंगांचा पसारा जसजसा वाढतो तसतशी ती रंगांच्या विळख्यात अडकत जाते. तिच्या आयुष्यात असलेली वेगवेगळी माणसेही त्या कलादालनातील शिल्पांमध्ये असतात. प्रत्यक्षात समोर येतात आणि आयुष्यात नकळत झालेल्या चुकांच्या बेरीज–वजाबाकीत ती अडकून पडतात.
कविताची भूमिका मेघा पाथरे यांनी रेखाटली असून, मामाची भूमिका नाटकाचे दिग्दर्शक गजानन चव्हाण यांनी साकारली. कलादालनात बराच वेळ शिल्पाकृती म्हणून स्टॅच्यू झालेल्या पेडणेकरची भूमिका साकारणारे शाम शिंदे आणि विजय देशमुखची भूमिका साकारणारे गणेश मिंडे यांच्या अभिनयाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.सुभाष पेडणेकरची भूमिका साकारणाऱ्या चंद्रकांत सावंतचा आक्रोश रसिकांना स्तब्ध करणारा ठरला.याशिवाय सोनल आजगावकर (वंदना), अनिल गावडे (गणेश), विजय परब (शिंदे), संविद नांदलस्कार (सुर्वे), सचिन सावंत (दीपक), रवींद्र कुलथे (विकी) यांच्यासह पाडुरंग दाभोळकर, विजया जाधव, प्रतीम कांदळगावकर, सचिन कोळी, संतोष खाडे, सुहास कांबळे, विलास गाड यांनी छोटय़ा–छोटय़ा भूमिकांतून नाटकाचा कॅनव्हॉसवरील रंगालेख उंचावण्याचा प्रयत्न केला.
हे नाटक रंगवण्यासाठी विजय कोळणकर यांचे नेपथ्य, प्रशांत सावंत यांची प्रकाशयोजना, विजय वारंग यांची वेशभूषा, हेमंत अधटराव यांचे पार्श्वसंगीत, सुनील ताम्हणकर यांची रंगभूषा ठरली. रंगमंच सहायक म्हणून माधवी जुवेकार आणि प्रवीण नाईक यांनी आपली जबाबदारी समर्थपणे पेलली.