हॉटेल लीलाच्या कलादालनात चित्रप्रदर्शन सुरू
पुण्याच्या प्रसिद्ध रंगलेखिका माधवी जोशी यांचे ‘निर्मिती’ हे चित्रप्रदर्शन २७ फेब्रुवारीपासून अंधेरी येथील हॉटेल लीलाच्या कलादालनात सुरू झाले असून, ते ५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
‘निर्मिती’तील कलाकृती मुख्यत: अनादी काळातील संस्कृती वैभव, इतिहास व वैदिक काळापासून असणाऱ्या धार्मिक रुढी–परंपराचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आहेत. शंख, चक्र, गदा, डमरू, त्रिशूल अशी चिन्ह वापरून शीव–शक्ती त्याचप्रमाणे कासव, मासा, सूर्य, चंद्र व दशकावतार यावर आधारित आहेत. जन्म,मृत्यू, पुनर्जन्म व अवतार याचे महत्त्व ही चित्र सांगतात. मानवी जीवनातील मूल्ये,संस्कृती, निष्ठा, परंपरा व त्याचे महत्त्व या संकल्पनेभोवती ही चित्रमालिका गुंफलेली आहे.
लहानपणापासून चित्रकलेची आवड असणाऱ्या माधवी जोशी यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी घेतली असली तरी त्या गेली १५ वर्षे चित्रकलेत रमल्या आहेत. त्यांच्या कलाकृतींची देश-विदेशात असंख्य प्रदर्शने भरली आहेत. माधवी जोशी यांचं कलाशिक्षण पुणे येथे झालं. नंतर काही एकल व सामूहिक प्रदर्शनांद्वारे त्यांनी आपली चित्रं पुणे, नवी दिल्ली, बंगलोर आदी ठिकाणी विविध कलादालनांतून सादर केली आहेत.
अलीकडेच त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन नरिमन पॉइंट येथील हॉटेल ट्रायडेंटच्या आर्ट वॉक कलादालनात लागले होते. त्या चित्रांतून माधवी यांनी स्त्रीसौंदर्य आणि तिच्या मनातील विविध भावना व त्यातील वैविध्य रेखाटले होते.