राज्य नाटय़ स्पर्धेत परभणीच्या कलावंतांचे सादरीकरण
पनवेलमध्ये सुरू असलेल्या राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत मंगळवारी परभणीच्या कलावंतांनी देवभक्तीच्या सुगंधाने भारलेले ‘सहज सुचलं म्हणून’ हे नाटक सादर केले. देव. देवावरची श्रद्धा. त्याचे अस्तित्व मानायचे की नाकारायचे यावर हसत खेळत भाष्य करणारे हे नाटक आहे. परभणीच्या राजीव गांधी युवा फोरमची निर्मिती असलेले हे नाटक रविशंकर झिंगरे यांनी लिहिले असून, विजय करभाजन यांनी दिग्दर्शित केले आहे.
एका खोलीत राहणारे दोन मित्र. सुन्या आणि आन्या.सुन्याचा देवावर विश्वास तर आन्या टोकाचा नास्तिक.सुन्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन ‘देव’ असल्याचे सांगून एक व्यक्ती या दोघांच्या घरात प्रवेश करतो. तो येतो तेव्हा आन्या घरात असतो. ‘मी देव आहे, सुनीलवर प्रसन्न होऊन त्याला ‘वर’ देण्यासाठी आलोय’, असे तो सांगतो.आन्याला गंमत वाटते. सुन्या घरात येतो, तेव्हा या ‘देवा’ला तो ओळखत नाही. कोण आपण, अशी विचारणा करतो. तेव्हा देव म्हणतो, मी आन्याचा मामा. सुन्याने आपल्याला ओळखावे अशी त्या देवाची अपेक्षा असते. हा देव आन्यासोबत वावरताना ‘देव’ आणि सुन्या असला तर ‘मामा’ म्हणून वावरतो.अशातच सुन्यावर संकट कोसळते. त्या संकटातून ‘देव’ म्हणवणाऱ्या या गृहस्थाने सुन्याला वाचवावे, अशी आन्याची अपेक्षा असते. देव म्हणतो, मी नाही वाचवू शकत. मी कुणाला संकटातही टाकत नाही, कुणाला वाचवतही नाही. ते माझे काम नाही.असे अनेक वाद या नाटकात होतात आणि देवभक्तीचे हे नाटय़ रंगत जाते.
यातील आन्याची भूमिका किशोर पुराणिक यांनी वठवली असून,विनोद डावरे (सुन्या), प्रा. किशोर विश्वमित्रे (देव), भानुदास जोशी(आन्याचे वडील बापू), संचित आरळकर (छोटय़ा आन्या,बालकलाकार) यांनी त्याला समर्थ साथ दिली आहे. त्र्यंबक वडसकर–बालनाथ देशपांडे यांचे नेपथ्य, उदय कात्नेश्वकर–उपेंद्र दुधगांवकर (पार्श्वसंगीत), दिगंबर दिवाण–नागेश दिवाण(प्रकाशयोजना), प्रसाद देशपांडे–राजकुमार ढगे (रंगभूषा), प्रा.सुरेश लासीनकर–प्रमोद बळ्ळाल (वेशभूषा) यांनी नाटकाच्या तांत्रिकबाबी चोखपणे सांभाळून नाटक रंगवण्यासाठी मोलाची भूमिका वठवली आहे.