तीन तरुण कलावंतांचे प्रदर्शन जहांगीरमध्ये सुरू
सोलापूर येथील तीन तरुण समकालीन कलाकार सागर रामपुरे, विनायक रामपुरे व मिनाक्षी रामपुरे यांच्या नवनिर्मित व आकर्षक चित्र व शिल्पांचे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीत ३ मार्चपासून सुरू झाले असून ते रसिकांना ९ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पहायला मिळणार आहे.
शिल्पकार सागर रामपुरे यांचे वडील प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरेअसून, वडिलांपासूनच त्यांना शिल्पकलेचा वारसा लाभला आहे. वडिलांच्या हातातली जादू हुबेहूब सागर रामपुरे यांच्या हातात उतरली आहे. निर्जीव मातीला जीवंत करण्याचे काम सागर रामपुरे आपल्या शिल्पांच्या माध्यमातून करीत असून, या प्रदर्शनासाठी त्यांनी अशीच काही जीवंत शिल्पे बनवली आहेत. इपोक्सी रेझिन व फायबर ग्लास वापरुन निर्मिलेली त्यांची शिल्पे खरोखर मनोवेधक आहेत. त्यांनी “पास्ट फॉरवर्ड”या शिल्पात गत आठवणीवर आधारीत जीवनाचा प्रवास व त्यातील पैलूचे दर्शनसाकारले आहे.
मानव जीवनामध्ये वर्तमानआयुष्य जगत असताना भूतकाळात आपले एक एक अंश सोडत असतो आणि त्यातूनच वर्तमानाची निर्मितीकरत असतो. याच संकल्पनेवर आधारीत ही शिल्पं तयार करण्यात आली आहेत. “जर्नीऑफ लाइफ” या शिल्पामध्ये मानवी जीवनाचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मानवाचा प्रवास जिथून सुरू होतो त्याच बिंदुवर येऊन तो संपतो या संकल्पनेवर आधारलेलं हे शिल्प आहे. त्यांचे “माइकल जॅक्सन”हे शिल्प “ब्लॅक ऑर व्हाइट”या प्रसिद्ध गाण्यावर आधारीत आहे. या शिल्पातसागर रामपुरे यांनी माइकल जॅक्सन यांचा बालपणीचा सावळा चेहरा आणि तरुणपणीचा गोरा चेहरा यांचा सुंदर मिलाप दाखवण्याचा प्रयत्न केला असून त्यातील कलात्मकता व रम्यता खरोखर प्रशंसनीय आहे.
चित्रकर्ती मीनाक्षी रामपुरे यांनी चित्रकलेचे शिक्षण अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथे केले असून सदर प्रदर्शनात मांडलेली तेलरंगातीलअमूर्त शैलीतील कॅनव्हासवरील चित्रे निसर्गावर आधारीत आहेत. निसर्ग हा अनेक घटकांनी बनलेला आहे. प्रत्येकाचं अस्तित्व हे त्याच्या गुणधर्मानुसारवेगवेगळं आहे. पण जेव्हा ते निसर्गाच्या प्रवाहात विलीन होतात. तेव्हा एकवेगळंच आकार व भाव बनतात. हेच आकार मिनाक्षी रामपुरे यांच्या चित्रात पहायला मिळतात.
निसर्गाचे विविध अदभूतरम्य रुपे आपल्याचित्रांमधून साकारताना त्यांनी त्यात रंगलेपनातील कौशल्य, माध्यमावरील प्रभुत्व व विविध रंगांची नादमयता आणि त्यातील समन्वय हयांचे अनोखे दर्शन घडवले आहे. पुरेशी बोलकी व कलात्मक अशी ही निसर्ग चित्रे सर्वांचे मन वेधून घेतात व त्यांच्याशी संवाद साधतात.
शिल्पकार विनायक रामपुरे यांनी भारती विद्यापीठ पुणे येथून शिल्पकलेचे घेतले आहे. त्यांनी फायबर ग्लास व स्क्रॅप मटेरियल वापरुन आपल्या कलात्मक व अभूतपुर्व शैलीत तयार केलेली शिल्पे खरोखर मनोवेधक व आकर्षक आहेत.
“लोटस पाँण्ड” या अदभूतरम्य ह्या शिल्पाच्या निर्मितीसाठी त्यांनी तांबा, पितळ, अल्युमिनियम,लाकूड, लोह वगैरे स्क्रॅप मटेरियलला अत्यंत कल्पकतेने व सौंदर्यपूर्ण नजरेतून वापरले आहे, त्यातील दृश्यपरिणाम मनोवेधक आहे. त्यांची इतर शिल्पे अठरा विद्या आणि चौसष्ठ कलेचा अधिपती असलेला गणपती हा वाद्यवाजवण्यात मग्न आहे या संकल्पनेवर आधारलेली आहेत.
एकंदरीत विनायक रामपुरे, मिनाक्षी रामपुरे व सागर रामपुरे या सोलापूरच्या प्रसिद्ध रामपुरे घराण्यातील नव्या पिढीने तो कलेचा वारसा अतिशय कल्पकतेने पुढे चालवला आहे. व त्यात आपल्या संकल्पनांनुसार योग्य ती भर घालून तो नयनरम्य व सौंदर्यपूर्ण आविष्कार रसिकजनांपूढे मांडला असून त्याला लाभणारी कलाप्रेमी व रसिकांची दाद आणि प्रशंसा त्यांच्या उर्वरित निर्मितीसाठी प्रेरणा, उत्तेजन देईन.