आपल्या मातीतले सिनेमे जागतिक स्तरावर जावे : गोविंद निहलानी
मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात गुरुवारी (१५ डिसेंबर) १५ व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन झाले. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत रंगलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल नाईक यांच्या हस्ते ‘एशियन फिल्म कल्चर अॅवॅार्ड’ने सन्मानित करण्यात आले.

‘आशियाई चित्रपट महोत्सवाच्या’ माध्यमातून चित्रपट चळवळीला नवी दृष्टी देण्याच्या प्रयत्नांचे कौतुकही निहलानी यांनी यावेळी केले.
राम नाईक यांनी ही आशियाई चित्रपट महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगांवकर यांच्या कार्याचे कौतुक करताना सुधीर नांदगांवकर यांच्या सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, संचालक सुधीर नांदगांवकर, लघुपट विभागाचे ज्युरी मेंबर रमेश तलवार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यंदाच्या महोत्सवातील सर्वच कलाकृती दर्जेदार असून त्याचा आस्वाद रसिकांनी आवर्जून घ्यावा असे आवाहन सुधीर नांदगांवकर यांनी केले. २२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवादरम्यान अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत. महोत्सवात इराण, नेपाळ, जपान बांगलादेश, कोरिया, व्हिएतनाम, लेबेनॉन इत्यादी देशातील आशयघन चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटाच्या वेगळ्या विभागांतर्गत मराठी चित्रपटांचा आस्वादही या महोत्सवात घेता येणार आहे. या महोत्सवात लघुपटांची स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे.