सांगलीच्या ‘सांस्कृतिक कलामंच’ची हृदयस्पर्शी प्रस्तुती
पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या नाटय़ स्पर्धा सुरू असून, त्यात पंधरावे पुष्प सांगलीच्या कलावंतांनी `एक चादर मैलीसी’ या तीन अंकी नाटकाद्वारे गुंफले. पंजाबी लोकजीवनाचे सौंदर्य लाभलेली ही कलाकृती आणि त्यातील भावबंधाला पनवेलकर रसिकांनी दाद दिली.
सांगलीच्या `सांस्कृतिक कलामंच’ने शुक्रवारी राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादर केलेली ही कलाकृती रवींद्र सिंग बेदी यांच्या कादंबरीवर आधारित असून, हे नाटक प्रकाश गडदे यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केले आहे. पंजबमधील एका खेडय़ात शीख समाजात एक प्रथा असते. तरुणपणी पती वारला तर त्याच्या पत्नीचे लग्न दीरासोबत लावून देण्यात येते. या प्रथेनुसार रानोचा पती त्रिलोकची हत्या होते. त्यामुळे त्रिलोकचा भाऊ मंगलशी लग्न करण्याची वेळ रानोवर येते. मंगल हा लहानपणापासून रानोच्या अंगा-खांद्यावर खेळलेला असतो, त्यामुळे हे नाते वहिनी-दीराचे न राहता आई-मुलाचे झालेले असते. त्यातच मंगल हा एका बंजारा मुलीच्या प्रेमात पडलेला असतो. तिच्यासोबत तो लग्नाच्या आणा-भाकाही घेतो. प्रथेनुसार गावपंचायत रानो आणि मंगलला लग्न करण्याचे फर्माण काढते. अचानक नाते बदलण्याच्या संघर्षाची गोष्ट या नाटकात विणली जाते.
एका सामाजिक रुढी आणि परंपरेवर भाष्य करणाऱया या नाटकात रानोची भूमिका शिवानी घाटगेने प्रभावीपणे साकारली असून, मंगलची व्यक्तिरेखा साकारणाऱया राज सानेने तिला यथोचित साथ दिली आहे. मनीषा हसबनीस(जिंदा), प्रणोती पाटील (बडी), अपर्णा कल्ळोळ (चन्नो),ज्योती आदाटे (पुरन), मानसी बरगाले (सलामती), प्रशांत यादव (त्रिलोक), राजकुमार राठोड (हुजुरा), विनायक हाके (केशरसिंग), प्रभाकर कांबळे (रहिम), ओंकार रजपुत (गुरुदास), प्रकाश गडदे (ज्ञानचंद), सत्याप्पा मोर (ईश्वरदास), हेमंत पाटील (जसवंत), सुनील शिंदे (इस्माईल), निखिल बसरगे (संतासिंग), अनिकेत परब (बंतासिंग), दिगंबर मोहिते (केदारसिंग), दिगंबर गायकवाड (जग्गू), धनाजी माने (डुल्ला),कुलसेन चौगुले (करमदिन) यांच्यासह निखिल आपटे, सचिन सपताळ, राजू सनदी, प्रशांत बेळंकी आदी कलावंतांनी या नाटकात वेगवेगळ्या भूमिकांद्वारे आपापली जबाबदारी पेलली आहे.
रोहित दांडेकर यांचे संगीतसंयोजन, चंद्रकांत दीक्षित यांचे नेपथ्य, यशपाल सारनाथ यांची प्रकाशयोजना नाटकाची गोष्ट फुलवण्यासाठी तोलामोलाची ठरली. प्रशांत कुलकर्णी यांच्या वेशभूषा आणि रंगभूषेने नाटकाला पंजाबी बाज देण्यासाठी मोलाची भूमिका वठवली.
छायाचित्रे : निखिल गोडसे