सोलापूरच्या विकास वाचनालयाचे दमदार सादरीकरण
राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत बुधवारी सोलापूरच्या विकास वाचनालयाने आनंद खरबस लिखित आणि दिग्दर्शित ‘इस्कॅलॅवो’ नाटकाचा प्रयोग सादर केला. आपल्या आयुष्यात जे काही लिहून ठेवलेले असते, त्यानुसारच आपण जगत असतो. त्याचीच गोष्ट सांगणारे हे नाटक प्रभावीपणे सादर करण्यात सोलापूरच्या कलावंतांनी यश मिळवले.
‘इस्कॅलॅवो’ म्हणजे प्रतिकार शक्ती नसलेला. स्वातंत्र्याची जाणीव संपलेला. स्वत:च्या मर्जीप्रमाणे जगू न शकणारा. इस्कॅलॅवो. माणूस गुलाम असतो नियतीचा. आपण सारे तसेच असतो, हे सांगणारे नाटक एका भटकणाऱ्या तरुणाभोवती फिरत राहते. हा तरुण असेच भ्रमण करून जिथे अचूक भविष्य सांगितले जाते अशा एका मंदिरात येतो. त्या मंदिरातील महिला त्याचा हात पाहताच दचकते. त्याला भविष्य सांगण्याऐवजी ती तीन शब्द उच्चारते. ते तीन शब्द म्हणजे.. सेरेपी, स्कीलार, एली. या तीनही शब्दांचा अर्थ त्याला माहिती नसतो. ते शोधण्यासाठी तो सर्वत्र भटकतो. एकएक करून त्याला ते अर्थ माहिती होतात. सेरेपी म्हणजे कटय़ार. स्कीलार म्हणजे सूर्यरत्न आणि एली म्हणजे ती भविष्य सांगणारी महिला. तीनही शब्दांच्या अर्थ शोधण्याच्या प्रवासात एलीचा अर्थ त्याला गवसतो आणि धक्का देऊन हे नाटक संपते.
या नाटकातील नायक तरुणाची भूमिका अमोल देशमुख याने साकारली असून, त्याला सुहास मडकर (धिवर), किरण जोशी (सैन्यप्रमुख), संतोष कासे (क्रिकस), अपूर्वा पकाले (अल्थिया), आल्हाद अंदोरे (अनिस), एकता तुळजापूरकर आणि प्राची जेऊरकर (दासी, नर्तकी), अमीर तडवळकर (याकिरा), तृप्ती मंडलीक (सेविका), गणेश राशीनकर (मोतीवाला, तत्वज्ञ), गणेश गवंती (खलाशी), विनय निंबाळकर (तेलवाला गुलाम), सूरज लोंढे (जहाजाचा कप्तान), शैलेश वाडकर (गुलामांचा व्यापारी), स्वप्नील करवंदे (सैनिक), सौरभ बऱ्हाणपुरे (अनिसचा मित्र, नर्तक), विष्णूपंत संगमवार, सागर पतंगे (ग्राहक), चेतन मुळीक (याकिराचा बाप, भोई), सागर बनसोडे (जवाहिर), कुबेर शास्त्री (सालारीस), शुभम वागदुर्गी (चोर, भोई), विनय जोशी, वरुण रेंबर्सू (सैनिक), दिपाली खळसुले (प्रवासी), विकास वाघमारे (गुलाम, भोई) यांनी समर्थ साथ दिली. किरण जोशीचे पार्श्वसंगीत, गणेश मरोडची प्रकाशयोजना, विष्णूपंत संगमवार यांचे नेपथ्य, स्मृती खरबस यांची वेशभूषा आणि शांता येळंबकर यांची रंगभूषा नाटकाची कथा रंगवण्यासाठी मोलाची ठरली.
छायाचित्रे : निखिल गोडसे