मुंबईस्थित तरुण चित्रकार विशाल साबळे यांच्या कलाकृतींचे चित्र प्रदर्शन मुंबईतील जहांगिर कलादालनात १२ मार्चपासून सुरू झाले असून ते १८ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. चित्रकार विशाल साबळे यांनी आजवर चित्रित केलेल्या स्त्री चित्रांमध्ये स्त्रीचे अनेक भाव आणि अंतरंग समर्थपणे चितारले आहेत.
या चित्रांमध्ये पुराणकालीन स्त्री व्यक्ती, इतिहासकालीन स्त्रिया आणि आधुनिक स्त्री असा प्रवास रेखाटला आहे. या सर्व स्त्रियांना चित्रकार विशाल साबळे नायिका म्हणूनच संबोधतात.
या प्रदर्शनात स्त्री एक शक्ती म्हणून किती श्रेष्ठ आहे, हे आपल्या चित्रांच्या माध्यमातून विशाल साबळे यांनी दाखवून दिले आहे. स्त्रीची नैसर्गिक आणि जन्मजात शक्ती तिला तिचे वेगळे आवकाश प्राप्त करून देते. चंद्राच्या कलांप्रमाणे बदलत जाणारे स्त्रीचे भावविश्व या चित्रांच्या माध्यमातून चित्रकाराने कॅनव्हासवर उतरवले आहे. स्त्रीचे भावविभोर डोळे,बदलती अदा, पदान्यास या सर्वामधून तिची मानसिक अवस्था पाहणाऱ्याच्या नजरेत भरते, यातच चित्रकाराचं कसब सामावलं आहे. कमलदल आणि स्वर्णमयी हृदय यांचा वावर सर्वच चित्रात दिसतो. या चित्रांमधली स्त्री कधी उत्सुक वाटते, कधी शांत तर कधी प्रसन्न अशी वाटते. ती प्रेम, संवेदना,काळजी याचीच एक मूर्ती आहे.
स्त्री ही आदिशक्ती आहे. प्रेम आणि भक्तीचे अजोड प्रतीक आहे. वात्सल्य आणि करुणा तिच्यात परिपूर्ण भरलेली आहे. अशा अनेकविध गुणांनी युक्त अशी ही आदिमाता विशाल यांच्या चित्रांच्या रूपात आपणास या प्रदर्शनात पाहता येईल.
विशाल साबळे यांचे कलाशिक्षण नागपुरातील शासकीय चित्रकला महाविद्यालयात झाले आहे. आजवर अनेक एकल प्रदर्शनांसह समूह प्रदर्शनांत त्यांच्या कलाकृतींनी प्रतिनिधित्व केले आहे. वेगवेगळ्या कार्यशाळा आणि शिबिरांमधून त्यांनी आपले चित्रज्ञान चित्रमित्रांसोबत शेअर केले आहे.