जहांगीर आर्ट गॅलरीत २४ मार्चपासून चित्रप्रदर्शन
नरेंद्र ठाकरे, पंकज खाळोदे आणि मनोज सोनावणे या तीन समकालीन तरुण चित्रकारांचं अलिकडच्या काळात चित्रीत केलेल्या चित्रांचं ‘बिटवीन नोन टू अननोन’ हे प्रदर्शन मुंबईत मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी,ऑडिटोरीयम हॉल, एम.जी.रोड, काळा घोडा, मुंबई ४००००१ येथे दिनांक २४ ते ३० मार्च २०१५ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील.
नरेंद्र ठाकरे यांनी आपल्या निरीक्षणातून मनात साठवलेली चित्रं आणि रंगछटा कॅनव्हासवर उतरवल्या आहेत. इतिहास, मिथक आणि सामाजिक, राजनीतिक तसंच सांस्कृतिक वास्तविकता यांचा मेळ साधताना चित्रकार नरेंद्र ठाकरे यांनी आपल्या मनातलं द्वंद्व आणि त्यावरचा आपला भाव चित्रांच्या माध्यमातून रसिकांना सादर केला आहे. आपलं अस्तित्व आणि संघर्ष यांना रुप देताना त्यांनी कलेचा यथोचित वापर केला आहे. आपलं अवकाश म्हणजेच जीवन आणि त्याचा अर्थ याचा परामर्श घेताना आलेली अनुभूती म्हणजेच नरेंद्र ठाकरे यांनी चित्रीत केलेली ही चित्रं आहेत. जे ‘पिंडी ते बह्मांडी’ यांची अनुभूती घेतल्यावर जो एक विरक्तीचा भाव निर्माण होतो तो कधी या चित्रांमधून डोकावतो तर कधी आपल्या शिवाय हे विश्व अपूर्ण आहे असं हा चित्रकार म्हणतो.
पंकज खाळोदे यांची चित्रं ही आत्मतत्त्व आणि परतत्व यांचा सारांश आहेत. आंतरीक भाव–भावनांचा शोध घेताना येणारा तरल अनुभव चित्रांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न चित्रकाराने केलेला दिसतो. अफाट विश्वाचा पसारा आणि तेवढंच अफाट आणि निरंतर वाढत जाणारे, व्यापून राहिलेले अंतरंग यांचा मेळ घालण्याचा प्रयास चित्रकाराने केलेला दिसतो.
मनोज सोनावणे यांची चित्रं ही गुरुत्वाकर्षणाच्या तत्वाचा मागोवा घेणारी दिसतात. काही जड वस्तू या आपल्या घनतेमुळे दुरूनही ठळकपणे दृष्टीस पडतात किंवा त्याचं महत्त्व जाणवत राहातं. रंग,रेषा आणि आशय यामुळे त्या ठिकाणचं गुरुत्वबल दाखवण्याचा चित्रकाराचा प्रयत्न आहे. माणसाचं शरीर, विचार आणि इच्छा यांवरसुद्धा गुरुत्वबल काम करीत असतं असं चित्रकाराचं म्हणणं आहे.
दृश्य आणि अदृश्य जगावर आपल्या कुंचल्याच्या सहाय्याने भाष्य करणारे हे या तीन चित्रकारांचं अनोखं प्रदर्शन मुंबईकर कला प्रेमींना पहाण्याची संधी प्राप्त झाली आहे.