एका तिकिटात बघायला मिळणार चार बालनाट्य!
मुलांच्या परीक्षा झाल्या. सुट्ट्या लागल्या. आता धम्माल करण्याचे दिवस आले असून, श्री महाकाली चित्र, शुभम प्रॉडक्शन, सुश्मित समूह प्रकाशित आणि सिद्धांत निर्मित “हसवणारे किंडर बॉय”, “छोटीसी सिंड्रेला”, “पिंटूचा खजिना छोटा जॉन सिना”, व “चार्ली पीके विरुद्ध मिस्टर बिन केके” ही वेगवेगळ्या आशयाची चार बालनाट्य मुलांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहेत. या नाटकांचा शुभारंभाचा प्रयोग १७ एप्रिल रोजी शिवाजी मंदिर येथे संपन्न होणार आहे.
बालनाट्याचे निर्माते – दिग्दर्शक रमेश वारंग दर सुट्टीत मुलांसाठी बालनाट्याच्या माध्यमातून मनोरंजनाचा खजिना घेऊन येत असतात. या वर्षीही ते एकाच तिकिटात “हसवणारे किंडर बॉय”, “छोटीसी सिंड्रेला”, “पिंटूचा खजिना छोटा जॉन सिना”, “चार्ली पीके विरुद्ध मिस्टर बिन केके” ही चार धमाल नाटके घेऊन आले आहेत.
लहान मुलांना विनोदी, परिकथा, अदभूत अशा विविध रसांची नाटकं फारच आवडतात अशाच रितीने लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक रमेश वारंग यांनी या नाटकांचे सादरीकरण केले असून प्रत्येक नाटकातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
“छोटीशी सिंड्रेला” या नाटकातून सिंड्रेला या एका छोट्याश्या गावातली गरीब मुलीची कथा प्रस्तुत करण्यात आली आहे, आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या ती कशी नावाजलेली अभिनेत्री होते, ही कथा यात मांडण्यात आली आहे. त्यामुळे जिद्द आणि मेहनतीमुळे जगात आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो असा या नाटकातून संदेश देण्यात आला आहे.
“पिंटुचा खजिना छोटा जॉन सिना” या नाटकातून मुलांना कोणत्याही परिस्थितीत न घाबरता धाडसाने कसं तोंड द्यावे या आशयाची कथा मांडण्यात आली आहे.
“चार्ली पीके आणि मिस्टर बिन केके” या नाटकातून “चार्ली आणि मि बिन” या पाश्चात्य विनोदी अभिनेत्याच्या माध्यमातून गरजू आणि अनाथ, गरीब मुलांना मदत करण्याचा संदेश देण्यात आला आहे.
दिग्दर्शक रमेश वारंग यांनी या नाटकात आपल्या अभिनय कार्यशाळेतील मुलांना संधी दिली असून त्यात त्यांना निर्मिती सुत्रधार सुधाकर नार्वेकर यांची मोलाची साथ मिळाली आहे. यात साई खरटमोल, सिद्धी पारकर, श्रावस्ती कांबळे, करण पवार, कृपा सावंत, दिक्षा जाधव, मोहनीश आडारकर, ओमकार मांडवकर, गणेश लिंगायत, आकाश जाधव, सनी तांबे, सुरज पाटील, जादूगर जे. के. व आकाश भागवत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रमेश वारंग यांची बालनाट्य म्हणजे बालकांसाठी फूल टु टाइमपास असं समीकरण ठरतील.