मराठी सिनेसृष्टीतील नवोदित तसेच ज्येष्ठ कलाकारांचा यथोचित सन्मान करणा-या संस्कृती कला दर्पण संस्थेची चित्रपट, व्यावसायिक नाटक, टीव्ही मालिका आणि वृत्त वाहिनी अशा एकूण चार विभागातील पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली आहेत. आता या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मानकरी कोण ठरणार, यावर कलावंत आणि प्रेक्षकांची नजर खिळली आहे. २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६. ३० वाजता शहाजीराजे क्रीडा संकुल (अंधेरीच्या स्पोर्टस कॉम्प्लेक्स) येथे अंतिम पुरस्कार सोहळा होणार आहे.
अल्पशा वेळेतच महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचली आहे. गेली १५ वर्ष सातत्याने होत असलेल्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी पुरस्काराने सगळ्यांच्याच मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. नाटक विभागात नामांकित झालेल्या ‘ त्या तिघांची गोष्ट’, ‘गोष्ट तशी गमतीची’; ‘कळात नकळत’; ‘समुद्र’ या नाटकांनी अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहे. त्यापैकी सर्वोत्कृष्ट नेपथ्य, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, लक्षवेधी अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट नाटक या विभागातील पुरस्काराकरिता चुरशीची स्पर्धा रंगली आहे.
चित्रपट विभागातील पुरस्कारांवर यंदाच्या सुपरहिट सिनेमांनी मोहोर लावली आहे. त्यात ‘क्लासमेट्स’ आणि ‘लोकमान्य-एक युग पुरुष’ आघाडीवर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता, पार्श्वसंगीत, संगीत, पार्श्वगायिका, पार्श्वगायक, छायांकन, संकलन, संवाद, पटकथा, सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता अशा एकूण ११ पुरस्कारांसाठी क्लासमेट्स सिनेमाला नामांकन प्राप्त झाली आहेत.
त्याचबरोबर मालिका विभागातील कलर्स मराठीवरील ‘कमला’; ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकांना सर्वोत्कृष्ट मालिकेचे नामांकन मिळाल्याने मालिकेतील कलाकारांची आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ६ ते ९ एप्रिल दरम्यान झालेल्या नाट्य आणि चित्रपट महोत्सवात एकूण ५ नाटक आणि ११ सिनेमे दाखवले गेले. त्याकरिता १९ नाटक, १२ मालिका आणि ५३ चित्रपटांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या.
चित्रपट विभागातील परीक्षक मंडळात असलेल्या अभिजीत पानसे, अमृता राव, अमित भंडारी, रेखा सहाय आणि स्मिता जयकर यांचा समावेश होता. तसेच नाट्य परीक्षण विभागात प्रमोद पवार शकुंतला नरे, अर्चना पाटकर यांनी परीक्षणाची जबाबदारी सांभाळली होती.
मराठी सिनेक्षेत्रात निर्माण होणा-या अप्रतिम कलाकृतीचा सन्मान करण्याचा एकप्रकारे संधीच आम्हाला या निमित्ताने मिळत आहे, अशी भावना परीक्षकांनी व्यक्त केली.
चित्रपट विभागात प्रथम येणा-या कलाकृतीला बक्षीस रोख रक्कम रुपये दीड लाख असून नाट्य विभातील विजेत्यांना एक लाख रुपये असणार आहे. तसेच दोन्ही प्रमुख विभागातील संबंधित इतर सहाय्यक विभागातील विजेत्यांना संस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे सन्मान चिन्ह बहाल करण्यात येणार आहे. या निवड प्रक्रियेत निवडलेल्या चित्रपटाना आणि नाटकांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही पारितोषिके मिळाली असल्याने संस्कृती कला दर्पणच्या निवडीबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील विश्वासार्हता द्विगुणीत झाली आहे.
लोअर परळ येथे संस्कृती कला दर्पणचा झालेला पहिला सोहळा ते मैदान अंधेरीच्या स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये होणारा १५वा संस्कृती कला दर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा टप्पा टप्याने बहरतच चालला आहे आणि तो असाच आपल्या आणि प्रेक्षकांच्या सहकार्याने यशस्वी होत जाईल, असा ठाम विश्वास असल्याचे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे, अध्यक्ष अर्चना नेवरेकर यांनी नामांकन सोहळ्यात व्यक्त केले.