प्रेमात पडायला लावणारं रोमॅंटिक नाटक
मॅजिक अवर क्रियेशन, आध्या क्रियेशन आणि अथर्व निर्मित, निर्माते शिवदर्शन साबळे, वैजयंती साबळे आणि संतोष भरत काणेकर यांचं प्रेमात पडायला लावणारं रोमॅंटिक नाटक “मी आणि ती”चा शुभारंभाचा प्रयोग २८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे होत आहे.
“परंपरा डॉट कॉम” या नाटकाच्या यशानंतर शाहीर साबळे यांचे नातू दिग्दर्शक शिवदर्शन साबळे यांनी हे नाटक रंगभूमीवर आणलं आहे. या नाटकाचे लेखन शिवदर्शन साबळे आणि तेजश्विनी लेले यांनी केले असून संगीत देवदत्त साबळे यांनी दिले आहे.
“मी आणि ती” या नाटकाची कथा आहे आदित्य आणि इरा या दोन तरुण तरुणींची. दोन भिन्न स्वभावाचं हे युगल प्रथम दर्शनी प्रेमात पडतं पण त्यांच्या स्वभाव भिन्नतेमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. पण शेवटी प्रेम कसं श्रेष्ट आणि खर्या प्रेमाचा अंतिम विजय कसा होतो या आशयावर या संगीतप्रधान नाटकाची उभारणी केली आहे.
नाटकाचे नृत्य दिग्दर्शन प्राजक्ता साठे, शिवदर्शन साबळे आणि हेमराज साबळे यांनी केले असून प्रकाशयोजना भूषण देसाई, वेशभूषा सचिन लोवलेकर, नेपथ्य विजय कोळवणकर तर रंगभूषा शरद सावंत यांची आहे.
आशिष कांबळी हे निर्मितीप्रमुख असून संजय माने व श्रवण विचारे यांनी निर्मिती व्यवस्था सांभाळली आहे. विशेष म्हणजे या नाटकात शाहीर साबळे यांचा नातू, शिवदर्शन साबळे यांचा भाऊ हेमराज साबळे प्रमुख भूमिका साकारत असून मिलिंद उके त्यांना साथ देत आहेत. तसेच चिन्मयी स्वामी, ऐश्वर्या तपाडिया, विक्रम पाटील, करण बेंद्रे, सायली बंदकर, निकिता नार्वेकर, अक्षय भोसले, अंकुश काणे, प्रणाली कदम, गीता घाग, अवदेश भोसले, अशोक ढगे, अमोल पणजी, शमा शिंदे, चंदन जमदाडे हे कलाकार इतर भूमिकेत असून या कॉलेजवयीन मुलांना या नाटकाद्वारे संधी देण्यात आली आहे.