नेहरू सेंटर आर्ट गॅलरी मध्ये चित्रप्रदर्शन सुरु
महाराष्ट्रातील फलटण तालुक्यातील चित्रकार नितिन वसंत कांबळे, श्रीवर्धन तालुक्यातील चित्रकार उमेश धनावडे व मुंबईतील पंकज तुळसकर हया तीन युवा चित्रकारांनी एकत्रित येऊन सादर केलेल्या चित्रांचे प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये दि. २१ एप्रिल पासून सुरू झाले असून ते सोमवार दि. २७ एप्रिलपर्यन्त रसिकांना ११ ते ७ या वेळेत पाहता येईल. सदर चित्रप्रदर्शनात अक्रीलिक रंग व मिक्स मीडिया वापरुन कॅनव्हासवर साकारलेली विविध कलारूपे आकर्षक व मनोवेधक आहेत.
चित्रकार पंकज तुळसकर यांनी अक्रीलिक रंगलेपनातून कॅनव्हासवर काढलेली चित्रे मानवी मनातील मुक्ततेची आस व महत्वकांक्षा तसेच ती मिळाल्यावर दिसून येणारी मानसिकता दर्शवितात. अनेक रूपकात्मक आकारातून व परिणामाद्वारे अपेक्षित अशी मानसिक मुक्तता व त्यातून साधणारा प्रयत्नवाद आणि सफलता यांचे नितांतसुंदर दर्शन विविध चित्रांतून सर्वांना घडते.
चित्रकार उमेश धनावडे यांनी अक्रीलिक रंगात कॅनव्हासवर रेखाटलेली अप्रतिम चित्रे ग्रामीण परिसरातील जीवन, त्यातील अनेक भावनिक पैलू व नादमयता दर्शवितात. दोन किंवा तीन व्यक्तींमधील भावनिक नाते, परिसरातील संगीताची नादमयता व जीवनातील वास्तव हयांचे रम्य दर्शन घडवणारी ही चित्रे रसिकमनाचा ठाव घेतात.
चित्रकार नितिन कांबळे यांनी मिक्स मीडिया वापरुन कॅनव्हासवर काढलेली अमूर्त शैलीतील चित्रे जीवनातील विविधांगी वास्तवाचे व निसर्ग चमत्कारांतील वैविध्य फार कलात्मकतेने दाखवितात. प्रत्येक चित्रात आढळणारी उचित रंगसंगती समन्वय व त्यातील विविध घटकातील परस्परसंबंध यामुळे या चित्रांचा एक वेगळाच दृश्यपरिणाम रसिकमनावर होतो.
एकंदरीत कलारूपांचे विविध पैलू येथे सामूहिकरित्या साकारताना सर्व चित्रकारांनी आपल्या शैलीचे व रंगमाध्यमावरील प्रभूत्वाचे एक मनोहर दर्शन घडवले आहे हे निर्विवाद.