४ मे रोजी विविध विषयांचे सादरीकरण
ग्लोबल कोकण महोत्सवामध्ये ४ मे रोजी सकाळी १० ते सायं. ६ वा. या कालावधीत ‘पर्यटन व्हिजन २०२५’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण पर्यटन उद्योग, सागरी पर्यटनातील विकासाच्या संधी व आव्हाने, कृषी पर्यटन, होम स्टे निवास व न्याहारी योजना, अॅडव्हेंचर टुरीझम, कोकण पर्यटनाचे मार्केटिंग अशा विविध विषयांचे सादरीकरण या पर्यटन परिषदेत केले जाणार आहे.
डोंगर, नद्या, किल्ले आणि भव्य समुद्र किना-यांनी नटलेली कोकणची भूमी पर्यटकांसाठी खूप मोठं आकर्षण होऊ शकते. कोकणातील आंबा-फणस हे जितकं मोठं आकर्षण आहे तितकचं कोकणातील निसर्ग सौंदर्यही महत्त्वाचं आहे. कोकणातील निसर्ग, पर्यटन यांना प्रसिद्धी मिळावी यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे ‘ग्लोबल कोकण महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. यंदा ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ ३० एप्रिल ते ४ मे दरम्यान गोरेगाव येथे नेस्को कॉम्प्लेस ग्राउंडवर आयोजित करण्यात आला आहे. कोकणातील पर्यटन विकासाला चालना मिळावी या उद्देशाने या महोत्सवात ‘उत्तूंग ते अथांग’ नावाचं पर्यटन दालन उभारण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील तसेच देशभरातील टूर ऑपरेटर्सना तसेच हॉटेलियर्स, कृषी पर्यटन, रिसॉर्ट व इतर पर्यटन व्यावसायिकांना ४ मे रोजी होणा-या ‘पर्यटन व्हिजन परिषदेसाठी आमंत्रित करून त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम या परिषदेच्या माध्यमातून केले जाणार आहे. राज्यांचे पर्यटनमंत्री प्रा. राम शिंदे, पर्यटन सचिव वल्सा आर. नायरसिंग, पर्यटन महामंडळ व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानोटीया, कोकणातील ५०० हून अधिक पर्यटन व्यावसायिक, पर्यटन क्षेत्रात काम करणारे मान्यवर तज्ञ या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. ग्लोबल कोकणाचे अध्यक्ष आ. भाई जगताप आणि स्वागताध्यक्ष आ. अॅड आशिष शेलार यांचाही सहभाग पर्यटन परिषदेत असणार आहे. कोकणात पर्यटन उद्योगाला खूप वाव आहे. या पर्यटनातून कोकणातील तरुणांसाठी लाखो रोजगार निर्माण करता येतील. या महोत्सवात कोकणाची पर्यटन समृद्धता दर्शवणारे पर्यटन दालनाबरोबर, उदयोगभूषण दालन, गुंतवणूक दालन, कोकणी कलाकारांचे कला दालन, खाद्य महोत्सव अशी विविध दालने उभारण्यात आली आहेत.
कोकणच्या या भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय महोत्सवात जास्तीत जास्त मुंबईकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्लोबल कोकण महोत्सवाचे प्रमुख कार्यवाहक संजय यादवराव यांनी केले आहे.