जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन सुरु
चित्रकार किशोर गांवकर, एन. कन्हैया, कौस्तुभ गावंड आणि भीमराया देविकेरी या सुप्रसिद्ध चार चित्रकारांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या चित्रकृतीचे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीच्या ऑडीटोरियम हॉलमध्ये दि. २६ मेपासून सुरू झाले असून ते सोमवार दि. १ जून २०१५ पर्यन्त रसिकांना ११ ते ७ हया वेळेत पाहता येईल.
चित्रकार किशोर गांवकर यांनी अमूर्त शैलीत रेखाटलेली निसर्गासंबंधी विविध चित्रे त्यांना बालपणापासून असणारी निसर्गाविषयी ओढ व कुतूहल ह्यांचे दर्शन घडवितात. विविध आकार, रंग, पोत, त्यातील वैशिट्यमय समन्वय, बोलकी व संवेदनात्मक समरसता ह्यांचा आपल्या चित्रमाध्यमातून ऊहापोह केला आहे. अत्यंत कलात्मक व मनोहर चित्रांमधून आपले विचार जनमानसापर्यंत पोचविताना त्यांनी आपल्या आंतरिक मनोभावनांचे व वास्तवाचे यथार्थ दर्शन घडविले आहे. त्यामुळे त्यांचा हा कलाविष्कार मनोवेधक व दर्शनीय वाटतो.
चित्रकार एन. कन्हैया यांनी वास्तववादी व पारंपारिक पण आकर्षक शैलीचा वापर करून अक्रीलिक रंगलेपनातून विविध चित्रे साकारली आहेत. मुख्यत्वेकरून त्यांची चित्रे सामाजिक बदल, परिवर्तन, ती मानसिकता व समाजप्रबोधन आणि त्यातून साधला जाणारा परिणाम यावर आधारित आहेत. प्रत्येक चित्रातील संवेदना व कल्पना वेगळी व रम्य असून सामाजिक बदल, परिवर्तनव त्यांचे दूरवर पसरलेले चांगले वाईट परिणाम यावर आधारलेला आविष्कार रसिकांपुढे सादर केला आहे. आकर्षक रंगछटा, पोत, नेटकेपणा वगैरेंनी नटलेली त्यांची विविध चित्रे मन थक्क करतात.
चित्रकार कौस्तुभ गावंड यांनी अक्रीलिक रंगलेपनातून कॅनवासवर काढलेली त्यांची विविध चित्रे मेडिसीनमय मानवी जीवनाचे व त्यातील विविध पैलूचे दर्शन घडवितात. मुंबईसारख्या महानगरातील संघर्षमय जीवन व त्यातून मार्ग काढून शांतीमय जीवन जगण्याची मानवाची जिद्ध व धडपड वगैरे गोष्टी त्यांनी आपल्या चित्रमाध्यमातून फार परिणामकारक रीतीने मांडल्या आहेत. घडाळ्याच्या काट्यावर असणारे धावपळीचे आयुष्य, त्यातील विदारक व संघर्षमय वास्तव, संगीतलहरी व अन्य मार्गातून मानसिक शांती मिळवण्याची मानवाची जिद्द, मेडिसीनच्या अतिरेकामुळे काही वेळा शरपंजरी पडल्यासारखी अवस्था असूनही आयुष्य जगण्याची दुर्दम्य लालसा असणारा अनोखा आधुनिक मानव वगैरे फार उत्कटतेने आपल्या चित्रांतून सादर केले आहेत.
चित्रकार भीमराया देविकेरी यांची एका वेगळ्या संकल्पनेतून व कलात्मक विचारधारा आणि अभिव्यक्तित्व यातून साकारलेली विविध चित्रे कलाकारास प्राणिमात्रांविषयी असणारे ममत्व व त्यांचे भावजीवन आपल्या चित्रांमधून सादर करताना त्यात असणारी आत्मियता ह्यांचे दर्शन घडवितात. गाय, बैल, गेंडा, बुलडॉग इत्यादी प्राण्यांचे वास्तविक व भावजीवन सादर करताना कलाकाराने विविध रंगलेपनासह साकारलेले अनेक वास्तववादी कलात्मक लेपन व त्यातून साधलेला एक रम्य व नादमय आविष्कार ह्यामुळे त्यांचे प्रत्येक चित्र आकर्षक व दर्शनीय वाटते.
एकंदरीत कलारूपांचे विविध पैलू येथे सामूहिकरित्या साकारताना सर्व चित्रकारांनी आपल्या शैलीचे व रंगमाध्यमावरील प्रभूत्वाचे एक मनोहर दर्शन घडवले आहे हे निर्विवाद.