मुकेश चौधरी आणि रोहन मोरे यांच्या चित्रांचे प्रदर्शन
मुंबईस्थित दोन तरुण चित्रकार मुकेश चौधरी आणि रोहन मोरे यांचं ‘द लास्ट पेज’ हे प्रदर्शन हिरजी जहांगीर आर्ट गॅलरी येथे १ जूनपासून सुरु होत असून ते ७ जूनपर्यंत सुरु राहणार आहे. शिक्षणाचा काळ संपत असताना वहीतील शेवटचं पानही लिहून संपतं, पण तिथेच खर्या जीवनाचा प्रारंभ होत असतो. संक्रमणावस्तेतील रुपदर्शन हाच या प्रदर्शनाचा आत्मा आहे.
अलिकडच्या काळात तैल रंगात रंगवलेल्या या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते १ जून रोजी दुपारी दिड वाजता होणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि भिवंडीचे आमदार रुपेश म्हात्रे हे मान्यवर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
मुकेश चौधरी यांनी चितारलेली चित्रं म्हणजे आनंद, आशावाद, मज्जा, उल्हासाचे कारंजे आहेत. फेरधरून नाचणारी मुलं, चाक चालवण्यात दंग झालेला मुलगा, उल्हसीत नजरेने वाट पाहणारी मुलगी, छोट्या बाळाला आंघोळ घालणारी प्रेमळ आई, गोट्या खेळणारा मुलगा अशी अनेक चित्रं आपल्याला आपल्या लहानपणाच्या स्मृतीमध्ये बांधून ठेवतात.
जीवनाशी दोन हात करीत जगणारी माणसं, तरूण आणि वयस्क माणसांची ओढाताण, आक्रस्ताळा चहराकरून बोलणारा गोसावी अशी अनेक वास्तवचित्रं रोहन मोरे यांनी तैलरंगात रंगवली आहेत. कॅनव्हासवर चित्रीत केली गेलेली ही चित्रं आपल्याला जगण्यातील दाहकताच विषद करून सांगतात. ताण, विषाद, एकता, काळजी, वाट पाहणे अशा अनेक भावभावना या चित्रांमध्ये हुबेहूब वठल्या आहेत.