प्रवीण धानुस्कर यांच्या कलाकृती २ जूनपासून जहांगीरमध्ये!
प्रवीण धानुस्कर या तरुण चित्रकाराचं ‘मॅनिफेस्टेशन ऑफ ड्युएलीझम’ हे प्रदर्शन जहांगीर कलादालनात २ जूनपासून सुरु होत असून ते ८ जूनपर्यंत चालणार आहे.
प्रवीण धानुस्कर यांनी आपल्या चित्रांमधून आताच्या समाजाच्या दुभंग पावलेल्या मानसिकतेचं दर्शन घडवलं आहे. कात्रीत सापडलेला तरूण वर्ग, संवादाचं भयाण स्वरूप, राजकिय वैर, व्यसनाधिनता, लैंगिक भावनांचा विकृतपणा अशा अनेक समस्यावर भाष्य करणारी चित्रं हा या प्रदर्शनाचा प्रमूख विषय आहे. आपल्या चित्रांव्दारे चित्रकाराने या समस्यांकडे समाजाचं लक्ष वेधलं आहे.
दु:ख आणि विघातक विचारांचा समाजात झालेला उद्रेक सद्यस्थितीतीत ठायीठाय़ी दिसून येतो. या सर्व पातळ्यांमध्ये दिसून येणार्या तामसी विचारांचा दृष्य अविष्कार म्हणजे ही चित्रं आहेत.
भौतिक गरजा भागवणार्या या आधुनिक जगात माणूस आपली स्वत:ची ओळख तर हरवून बसलाच, पण त्याच बरोबर तो सुख, समृद्धी आणि स्थायीभाव याची पाठ धरताना किती घायाळ झाला आहे याची जाण ही चित्रं पहाताना दर्शकास येते. मनुष्य आणि पशू यांत मुख्य अंतर आहे ते विचार, आचार आणि कृती मध्ये, कारण माणसाला या एकाच गोष्टीमुळे या सृष्टीमध्ये वेगळं स्थान प्राप्त झालं आहे. आघुनिक मानवाला याच आपल्या गुणांचा विसर पडला असून तो पशुंनाही लाजवेल अशी कृती करू लागला आहे. भग्न विचारधारा आणि बुद्धीभेद झालेला माणूस विनाशातून वाचण्यासाठी काय करू शकेल? असा प्रश्न दर्शकाला पडतो हेच या प्रदर्शनाचं विशेष म्हणता येईल.