शालिनी चंद्रा यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरु
चित्रकर्ती शालिनी चंद्रा यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन काळा घोडा येथील आर्ट एंट्रेन्स गॅलरीमध्ये दि. ३० मेपासून सुरू झाले असून, ते रसिकांना ५ जून २०१५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पहायला मिळणार आहेत.
रंगलेखिका शालिनी चंद्रा यांचे हे पहिलेच एकल प्रदर्शन असून यापूर्वी जवळजवळ २२ सामूहिक कलाप्रदर्शनातून त्यांनी विविध कलादालनात आपली चित्रे सादर करून रसिकांची वाहवा मिळवली आहे.
चित्रकर्ती शालिनी चंद्रा यांनी कॅनवासवर तैलरंग, जलरंग, पेस्टल, एक्रिलिक रंग व मिक्स मिडियम वापरुन वास्तववादी शैलीद्वारे आपली चित्रे रसिकांसमोर सादर केली आहेत. त्यांनी राधाकृष्ण व त्यांच्यातील उद्दात्त व निरामय तसेच दैवी प्रेम, निसर्ग आणि त्याची रम्यता तसेच भव्यता आणि विविध पक्षी व त्यांची काहीशी उत्कंठा वर्धक मानसिकता ह्या गोष्टी प्रकर्षाने आपल्या चित्रात मांडल्या आहेत.
पक्ष्यांचे विविध आकार आणि त्यांची महत्वपूर्ण संकल्पना व मानसिकता सादर करताना चित्रकर्ती शालिनी चंद्रा यांनी दाखवलेली मानसिक प्रगल्भता, वैचारिक ऊंची व रचनात्मक प्रयोगशीलता प्रशंसनीय आहे. त्यांचा हा बहुआयामी व रंगीबेरंगी असा चित्रखजिना बोलका व वैशिष्ट्यपूर्ण असून तो आपल्या मूलभूत गुणविशेषांमुळे सर्वांना आवडतो व रसिकांची दाद मिळवतो.