२४ जुलैला दिसणार सिनेमागृहांत
तरुणींच्या दिलाची धडकन वाढवणारा राजबिंडा, डॅशिंग हिरो पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे या हॅंडसम हिरोच्या वडिलांनीदेखील मराठी सिनेसृष्टीचा एक मोठा काळ गाजवला आहे. ते उमदे, देखणे अभिनेते म्हणजे रविंद्र महाजनी. त्यांचा सुपुत्र गश्मीर महाजनी ‘कॅरी ऑन मराठा’ सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत धमाकेदार एन्ट्री घेतोय.
“नंदा आर्ट्स” आणि “वॉरीयर ब्रदर्स मोशन पिक्चर्स” निर्मित ‘कॅरी ऑन मराठा’ सिनेमात गश्मीर प्रमुख भूमिकेत असणार आहे. मराठी मुलगा आणि कानडी मुलगी यांच्या लव्हस्टोरीला अक्शन सिक्वेन्सचा तडका दिलेला हा सिनेमा प्रेक्षकांच तुफान मनोरंजन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सिनेमाच दिग्दर्शन संजय लोंढे यांनी केलं असून कौशल – मोझेस यांनी अक्शन सिक्वेन्स डिरेक्ट केले आहेत. ‘कॅरी ऑन मराठा’ हा सिनेमा प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांसाठी कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज असेल. आपल्या मुलाच्या पहिल्या सिनेमाबद्दल प्रेक्षकांप्रमाणेच रविंद्र महाजनीदेखील तितकेच उत्सुक आहेत. २४ जुलैला हा सिनेमा महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रदर्शित होणार आहे.