पाचगणीत रंगलेल्या सामन्यांचा थरार २१ जून व २८ जूनला
यंदा पाचगणीत रंगलेल्या ‘महाराष्ट्र कलानिधी’ आयोजित ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’च्या दुस-या पर्वातल्या रंगतदार सामन्यांचा थरार झी टॉकीजवर येत्या २१ जून व २८ जूनला सांयकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे. यातला पहिला भाग २१ जून ला व दुसरा भाग २८ जून ला दाखवण्यात येणार आहे.
‘महाराष्ट्र कलानिधी’ आयोजित ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ पाचगणीत मोठ्या दिमाखात संपन्न झाली. सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत दहा संघांमध्ये सामने खेळले गेले आणि यात बाजी मारली ‘रत्नागिरी टायगर्स‘ या संघाने. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत सर्वच संघांनी एकमेकांना तोडीसतोड टक्कर दिली. विशेष म्हणजे अभिनेत्यांच्या बरोबरीने मराठी अभिनेत्रीनी देखील आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले. मराठी मनोरंजन विश्वाने क्रिकेटच्या मैदानात ठोकलेल्या चौकार षट्कारांची आतषबाजी आदिनाथ कोठारे, नेहा पेंडसे, स्मिता तांबे, माधव देवचक्के या व इतर कलाकारांचे नृत्याचे जलवे अशा मनोरंजनाच्या दुहेरी धमाक्याचं फूल टू पॅकेजचा आस्वाद प्रेक्षकांना घरबसल्या घेता येणार आहे.