भिवा पुणेकर यांच्या कलाकृतीचे २३ जूनपासून जहांगीरमध्ये प्रदर्शन
मुंबईस्थित सुप्रसिद्ध रंगलेखक भिवा पुणेकर यांचं ‘ट्रान्सेंडैंटल पर्सेप्सन्स’ हे चित्रप्रदर्शन मुंबईत मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन १६१ बी, ए.सी- २, जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी. रोड, काळा घोडा, मुंबई येथे २३ ते २९ जून या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील.
सदर प्रदर्शनाचं उद्घाटन वास्तूविषारद आणि अंतर्गत सजावटकार राजीव कसाट यांच्या हस्ते २३ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
चित्रकार भिवा पुणेकर यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रकृती या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. ब्रम्हांडातील दिव्य तेज आणि भव्यता यांचा मिश्र माध्यमांच्या सहाय्याने कागदावरचा अविष्कार या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येईल. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि अवकाश या पंचमहाभूतांची प्रभा आणि त्यांचा ठाशीवपणा या चित्रकृतींमधून मांडला आहे.
ओळी, ठिपके आणि रंगछटा या सर्वांमध्ये एक तालबद्ध संवाद साधत या कलाकृती साकार झाल्या आहेत. पंचमहाभूतांची एकमेकांशी अनंतकाळ चाललेली घुसळण आणि त्यांचा अंतरमनावर होणारा परिणाम यांचा आलेख या चित्रांमधून मांडलेला दिसतो. शांत आणि पसन्न भाव निर्माण करणारे रंग आणि आकृती यांचा अनोखा संगम असलेली ही चित्रं पाहणार्य़ाच्या मनावर खास छाप सोडून जातात.
भिवा पुणेकर यांनी सादर केलेल्या या चित्रांमधून सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो. प्रसन्नता, ऊर्जा आणि शांतता यांचा आत्मानुभव देणार्या कलाकृती दर्शकाला मन:शांतीची अनुभूती देतात.