‘भन्ते’ संघपाल यांच्या रंगलेखानाचं प्रदर्शन
जे.जे. स्कुल ऑफ आर्टचे सुवर्ण पदक विजेते चित्रकार ‘भन्ते’ संघपाल म्हस्के यांचं ‘आर्ट ऑफ हॅपीनेस’ हे चित्रप्रदर्शन मुंबईत मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन १६१ बी, ए.सी- ३, जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी. रोड, काळा घोडा, मुंबई येथे २३ ते २९ जून २०१५ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील. भन्ते संघपाल म्हस्केंसारख्या सन्यस्ताने कलाक्षेत्रात संपादन केलेलं हे यश आणि गाठलेली उंची खचीतच गौरवास्पद आहे. सुप्रसिद्ध कलाकार अरुणा देवकर यांच्या हस्ते सदर प्रदर्शनाचं उद्घाटन २३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
चित्रकार संघपाल म्हस्के एक बौद्ध भिक्षू असून बौद्ध विहारात वास्तव्यास असतानाच त्यांचा चित्रकलेमध्ये ओढा निर्माण झाला. आपल्या गुरूची संमत्ती घेऊनच त्यांनी चित्रकलेमधलं शिक्षण पूर्ण केलं आणि जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मधून सर्वोत्कृष्ट पोर्टट्रेट चित्रित केल्याबद्दलचा बहुमान मिळवला. विद्यार्थीदशेतच गृहत्याग केल्याने शिक्षण आणि साधना करताना या कलाकाराला तारेवरची कसरत करावी लागली.
बॉम्बे आर्ट सोसायटीचं २०१५चं व्यावसायीक चित्रकारांच्या वर्गवारीमधलं प्रथम पारितोषीक मिळवलेल्या संघपाल म्हस्के यांनी आपलं पहिलं एकल प्रदर्शन रसिकांसाठी सादर केलं आहे. असं असलं तरी या गुणी चित्रकाराची चित्रं महाराष्ट्राच्या राजभवनासारख्या प्रतिष्ठीत ठिकाणी आधीच पोहोचली आहेत.
ग्रामीण भाग, निसर्ग, शहरातली गल्ली, गावातला पार अशी अनेक चित्रं चितारताना या कलाकाराने कॅनव्हासवर रंगांचा सुंदर अविष्कार केला आहे. कलाकार आणि कलेचे चाहते यांच्या मधला संवाद सतत होत राहिला पाहीजे असं या कलाकाराला मनापासून वाटतं. त्यानी साकार केलेली चित्रं रसिकांनी पहावीत आणि आपल्या दृष्टीकोनातून त्यांचा अर्थ लावावा आणि त्याचा आनंद घ्यावा असा या चित्रकाराचा मानस आहे.