स्पर्धात्मक मराठी रंगभूमीचा इतिहास उलगडणार
राज्य नाट्यस्पर्धेच्या इतिहासाचे अवलोकन करणाऱ्या एका विशेष कार्यक्रमाचे प्रसारण येत्या रविवारी ५ जुलैला ‘एबीपी माझा’वर सकाळी ११:३०, दुपारी १:३०, संध्या ५:३० आणि रात्री ८:३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या देदीप्यमान इतिहासाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
हौशी रंगकर्मींसाठी हक्काचा रंगमंच असलेली स्पर्धा म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा. या स्पर्धेने मराठी रंगभूमी समृद्ध होण्यास मदत झाली. जगात फक्त महाराष्ट्रातच अशी स्पर्धा घेतली जाते. गेली ५४ वर्ष अविरतपणे चाललेली ही स्पर्धा राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाचा आरसा असून तात्कालिक रंगभूमीच्या इतिहासाची साक्षीदार आहे.
या राज्य नाटयस्पर्धेच्या सादरीकरणांचा किंवा त्या आठवणींचा एक कोलाज पुढच्या पिढीसाठी जतन करावा अशी कल्पना सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक अजय अंबेकर यांनी मांडली होती. आता त्या कल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून हा सारा ठेवा आता दृक्श्राव्य माध्यमातून जतन करण्यात आला आहे. या स्पर्धेच्या वाटचालीचा गौरवास्पद इतिहास पुढील पिढीतील कलाकारांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक संचलनालयाच्या वतीने रंगवैभव ही ध्वनिचित्रफित तयार करण्यात आली आहे.
यामध्ये मराठी रंगभूमीच्या सुरूवातीपासून अलिकडच्या तांत्रिकदृष्ट्या अधिक देखण्या असलेल्या नाट्य कलाकृतींपर्यंत रंगभूमीचे सर्व कालखंडांचा आढावा घेतला आहे. या ध्वनीचित्रफीतीचे चित्रीकरण आणि संकलन सुप्रसिद्ध निवेदक आणि ज्येष्ठ रंगकर्मी नरेंद्र बेडेकर यांनी केले आहे. बेडेकर म्हणाले, १९५५ पासून सुरू झालेली राज्य नाट्य स्पर्धा साठीकडे वाटचाल करीत आहे. हौशी नाट्य, बालनाट्य, संगीत नाटक, संस्कृत नाटक, हिंदी नाटक व व्यावसायिक नाटके इतक्या व्यापक प्रमाणात आयोजित होणारी ही गौरवसंपन्न स्पर्धा म्हणजे त्या त्या काळातील रंगभूमीचा इतिहास आहे. हा इतिहास आपल्याकडे कोठेही संग्रहित नाही. याची दखल घेवून आम्ही आखो देखी आप ही की जुबानी… या संकल्पनेने ज्येष्ठ कलाकारांच्या मुलाखती, किस्से, आठवणी यांचे संकलन करण्यास सुरूवात केली.
यामध्ये विजया मेहता, माधव वझे, कमलाकर सोनटक्के, कमलाकर नाडकर्णी, बापू लिंमये, प्रशांत दळवी, जयंत पवार, अरुण नलावडे, गुरुराज आवधानी, पुरुषोत्तम बेर्डे, अजित सातभाई, रंजन दारवेकर, योगेश सोमण, अरुण नलावडे, जयंत पवार आदी मान्यवरांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे याकामी बेडेकर यांना कै. आर. टी. देशमुख यांनी जतन केलेल्या ठेव्याचा फारच उपयोग झाला.
आर. टी. देशमुख यांनी त्या काळात अगदी विनामोबदला नाटकांचे फोटो काढून ठेवले होते. त्यांनी त्या वेळी केवळ हौस म्हणून काढलेल्या या फोटोंमध्ये मराठी रंगभूमीचा एक मोठा इतिहास संग्रहित झाला आहे. त्यांनी आपला हा ठेवा शासनाला दिला होता. त्यातून त्यांना बरीच माहिती मिळाली. सरकारी दप्तरांमधून सादर झालेली नाटके, त्यांचे संच, त्यातल्या कलाकारांची नावं मिळाली.
बेडेकर म्हणाले, ही ध्वनीचित्रफितीसाठी तब्बल ६ तासांचे रेकॉर्डीग करण्यात आले असून ती सहा भागांमध्ये आहे. पहिला भाग मागोवा रंग परंपरेचा यामध्ये मराठी रंगभूमीची सुरूवात आहे. मुहूर्तमेढ नव्या रंगविश्वाची या दुसर्या भागात राज्य नाट्य स्पर्धेची सुरूवात, तिसरा भाग विस्तार रंग जाणिवांचा यामध्ये जागोजागी राज्यनाट्य स्पर्धेची प्रादेशिक केंद्र सुरू झाल्याची वाटचाल आहे. चौथा भाग जाणिव रंग तंत्राची यामध्ये नेपथ्य, प्रकाश योजना, दिग्दर्शन आदी तांत्रिक अंगाचा कसा विकास होत गेला हे दाखवण्याच आले आहे. तर शेवटी रंग श्रीमंतीचे दर्शन भाग-१ व भाग २ असे सहा भागात ध्वनीचित्रफित असणार आहे. शेवटच्या दोन भागात १९८० पूर्वी व नंतर स्पर्धेत सादर झालेल्या नाटकांचा आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये चंद्र नभीचा ढळला, घाशिराम कोतवाल, तू वेडा कुंभार, महापूर महानिर्वाण, शांतता कोर्ट सुरू आहे, बाभूळ बन,तू आदी नाटकांचा समावेश आहे.
या सांस्कृतिक ठेव्यामध्ये अजूनही भर पडण्याची शक्यता आहे. यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने थेट रंगकर्मीना आवाहन केले आहे. ज्यांच्याकडे या स्पर्धेची छायाचित्र,ध्वनी चित्रफिती असा काही ठेवा असेल त्यांनी त्याची एक कॉपी संचालनालयाला द्यावी, असे आवाहनयानिमित्ताने करण्यात आले आहे.
यंदाच्या विभागीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये या ध्वनिचित्रफितीचे काही अंश संकलीत स्वरूपात दाखवण्यात येत आहेत,तसेच त्याची मूळ प्रत ही अभ्यासकांसाठी मुंबईच्या पु.ल देशपांडे कला अकादमीत ठेवण्यात आलेली आहे. या सा-या तपशिलाचा अभ्यासकांनी जरूर फायदा घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.