६ जुलैपासून भक्तीमय प्रवास!
कलर्स मराठीवर पालखी या कार्यक्रमातून आषाढी वारीचा रंगतदार सोहळा प्रेक्षकांना ६ जुलैपासून संध्याकाळी साडेसहा वाजता अनुभवता येणार आहे. आषाढी वारीचा भक्तीमय प्रवास या कार्यक्रमातून घडणार आहे. या वेळी विठ्ठल भक्तीचे अनेक रंग प्रेक्षकांना पालखी ह्या कार्यक्रमात पहायला मिळतील.
लिटल चॅंप कार्तिकीसंगे आषाढी वारीचा प्रवास सुरू होणार आहे. कार्तिकीचे सुरेल निवेदन, सुप्रसिद्ध कीर्तनकार चारूदत्त आफळेंचे रसाळ निरूपण आणि गावोगावची भजन मंडळी पालखी कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक मराठी कलावंत म्हणजेच मकरंद अनासपुरे, रेणुका शहाणे, चिन्मय मांडलेकर, पंढरीनाथ (पॅडी) कांबळी, मधुगंधा कुलकर्णी, डॉ. सलील कुलकर्णी, रवींद्र मंकणी असे अनेक कलाकार त्यांच्या वारीचे अनुभव कलर्स मराठीच्या प्रेक्षकांना सांगणार आहेत.
कलर्स मराठीचे काँटेंट हेड संजय उपाध्याय यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “पंढरपूरच्या वारीचे केवळ प्रक्षेपण न करता या वारीला एक अनुभव स्वरूप प्रेक्षकांसमोर मांडणारी कलर्स मराठी ही पहिली मराठी करमणूक वाहिनी आहे. पंढरपूर हे अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. ‘पालखी’ या कार्यक्रमाद्वारे मराठी प्रेक्षकांशी असेलेले आमचे नाते आणखीन घट्ट झाले आहे.”