‘तळ्यात मळ्यात’ अभिनयाची त्रिकोणी जुगलबंदी
आपण आपल्याच जगण्याभोवती ख-या-खोटय़ाचे जाळे विणत असतो. अनाहुतपणे त्यात अडकत जातो.त्या अडकण्यातून नवनव्या खरे-खोटेपणाची गुंतागुंत वाढवतो. कधी संशयाच्या कल्लोळाने अस्वस्थ होतो तर कधी आपल्या माणसाच्या जिव्हाळ्यानेप्रेमाचे घरटे बांधतो. आयुष्यातील अशा असंख्य वळणदार टप्प्यांना रहस्यमयतेची आकर्षक झालर लावून एक नाटक अनेक प्रश्नांचे जाळे विणते आणि चकित करणा-या वास्तवापर्यंत रसिकांना खिळवून ठेवते… या नाटय़ाविष्काराचे नाव आहे ‘तळ्यात मळ्यात’!
अभिजित गुरूने `तळ्यात मळ्यात’या खेळाद्वारे व्यावसायिक नाटकात नाटय़लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून दमदार पदार्पण केले आहे. समिधा देशपांडे-गुरू,अमृता संत आणि अभिजित अशा तिघांच्या अभिनयाची त्रिकोणी जुगलबंदी या खेळाला श्रीमंत करणारी आहे. या त्रिकोणाला राजू बावडेकर आणि विक्रम पाटील या दोन कलावंतांनी छोटय़ा भूमिकांमधून भक्कम आधार दिला आहे.
पडदा उघडतो तेव्हा अश्विन (अभिजित गुरू) आणि त्याची बायको नीलिमा (अमृता संत) दिसते. दोघांचे कुटुंब. नीलिमा नोकरी करते. अश्वीन लेखक आहे. तो लेखनात अडकला आहे; पण प्रचंड अस्वस्थ आहे. नीलिमाच्या प्रश्नांवर त्याचे दचकणे, त्याचे सावरणे यातून त्याचा गोंधळ परिणामकारकपणे अधोरेखित करण्यात आला आहे. तो नाटकभर गुंफला आहे. नीलिमा ऑफिसला जाण्याच्या घाईत. त्यात ती स्वत:ला सजवते, त्याच्या काळजीपोटी त्याला सूचना देते,आवराआवर करून घरातून बाहेर पडते. ती घराबाहेर पडताच अश्वीन मोबाईलवरून स्विटी (समिधा गुरू)शी बोलतो. आता तो अश्वीन नाही. तो आहे आयबी एजंट राज. स्विटी ही त्याची आयबीतील सहकारी. स्विटीला राजच्या खासगी आयुष्यापासून सारे काही माहिती आहे. नीलिमाला मात्र स्विटी आणि अश्वीनबद्दल काहीही माहिती नाही. तिच्या नजरेतून तिचा नवरा हा लेखकच आहे. एक दिवस तो त्याचे कर्तृत्व सिद्ध करील, असा तिचा ठाम विश्वास आहे. अश्वीनला मात्र नीलिमापासून आपण हे सारे दडवून ठेवल्याबद्दल अपराधीपणाचे वाटते. तिला आपली खरी ओळख द्यावी, असे त्याला अनेकदा वाटते; पण स्विटी ते करू देत नाही. स्विटी आणि राज ड्रग माफियाला पकडण्याच्या माहिमेवर आहेत. तो एका हॉटेलमध्ये असल्याची खबर या दोघांना मिळते. त्याला पकडण्यासाठी ते जातात आणि रॉबर्ट डिसुझा नावाच्या माणसाला अश्वीन गोळ्या घालतो. या खुनाची वेगळी गोष्ट या नाटकात प्रवेश करते. रॉबर्टची बायको जेनी, मुलगा लोबो आणि सायमन नावाचा गृहस्थ या नाटकात प्रवेश करतात आणि या रहस्यनाटय़ाला वेगवेगळे कंगोरे देऊन जातात.
हे नाटक पुढे सरकताना या कथानकाचे वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यासाठी वेगवेगळ्या घटना-घडामोडींची पेरणी केली आहे. त्यामुळे आपोआपच नाटकात रसिक गुंतत जातो. त्याचे तर्क लढवायला लागतो. रहस्यमय नाटकात रसिकांना गुंतवून ठेवणे, हे त्या कलाकृतीचे बलस्थान ठरत असते. ते बलस्थान कमावण्यासाठी कुठलीही कसर लेखकाने सोडली नाही. या नाटकात नवरा-बायकोच्या नात्यातील संघर्षाचे भावविश्वही विणले आहे. त्यातून हे नाटक फक्त रहस्याच्या ताणाचे ओझे वाहायला सांगत नाही, त्या नातेसंबंधांतील भावविश्वाच्या रंजकतेतही गुंतवून ठेवते. कधी चिमटे काढते. कधी हसवते आणि कधी या नवरा-बायकोच्या संघर्षात रसिकांना अस्वस्थही करते.
या नाटकात कलावंतांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच असली तरी व्यक्तिरेखा असंख्य आहेत. अभिजित गुरूने अश्वीन आणि राज अशा दोन भूमिकांतून आपल्या अभिनय कौशल्याची भट्टी छान पेटवली आहे. समिधाने आयबी एजंट स्विटी रेखाटताना कुठेही कसर सोडली आहे. त्या भूमिकेतील सारे बारकावे ठसठसशीतपणे अधोरेखित केले आहेत.अमृताची भूमिका ही नोकरी करणारी स्त्राe अशी सर्वांना माहितीतली असल्याने जास्त अवघड होती. तिने हा अवघड डोंगर आपल्या अभिनयाच्या सामर्थ्यावर ताकदीने सर केला आहे. अमृता, समिधा आणि अभिजित या तिघांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये सरस कोण, हे सांगता येणे कठीण व्हावे एवढय़ा प्रचंड ताकदीने या तिघांनी `तळ्यात मळ्यात’चा डाव हसत खेळत रंगवला आहे. राजन बावडेकरने सायमन आणि तुकाराम तर विक्रम पाटीलने रॉबर्ट, जेनी, लोबो अशा वेगवेगळ्या भूमिकांद्वारे आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. या नाटकात आणखी काही भूमिका आहेत, त्या कोणत्या आहेत यासाठी आणि नाटकातील वळणदार रहस्यापासून आश्चर्यचकित करणारे वास्तव जाणून घेण्यासाठी हे नाटक बघावे लागणार आहे.
निर्माते शिवदर्शन साबळे, वैजयंती साबळे आणि संतोष भरत काणेकर यांच्या मॅजिक अवर क्रिएशन,आध्या क्रिएशन आणि अथर्व थिएटर या नाटय़संस्स्थेच्या बॅनरची ही निर्मिती आहे. संगीत शिवदर्शन साबळे यांचे असून नेपथ्य विजय कोळवणकर, प्रकाशयोजना भूषण देसाई, वेशभूषा सचिन लोवलेकर,रंगभूषा शरद सावंत यांची आहे. आशीष कांबळी हे निर्मितीप्रमुख असून, संजय माने, रुचिता शेलार, श्रवण विचारे, अवधेश भोसले, निकिता नार्वेकर, प्रणाली कदम, अमोल पंडजी यांनी निर्मिती व्यवस्था सांभाळली आहे. सूत्रधार अजित सरबळकर हे आहेत.
-रंगमैत्र