महाराष्ट्राची लाडकी लेक आणि जावई स्पर्धा जिंकणार का?
अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा या दोघांनी नच बलियेमध्ये पहिल्या तीनमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. अष्टपैलू अभिनेता सचिन पिळगावकर यांच्यानंतर नच बलियेची दुसरी मराठमोळी स्पर्धक म्हणून या ‘डान्सिंग क्वीन’ने ‘नच बलिये ७’ गाजवली आहे.
महाराष्ट्राची लाडकी लेक आणि जावई जोडीला ट्विटर, फेसबुक या सोशल साईट्समार्फत खूप शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यावर अमृताने सगळ्यांचे आभार मानले असून, या स्पर्धेत विजयी करण्यासाठी १८००२७४१००३ या क्रमांकावर मिस कॉल देण्यासाठी विनंती केली आहे. १२ ते १९ जुलै सायंकाळी ७ पर्यंत वोटिंग लाईन खुल्या राहणार आहे.
नच बलियेमध्ये अमृता आणि हिमांशूने सादर केलेले एकापेक्षा एक डान्स फॉर्म्स परीक्षकांसह प्रेक्षकानाही खूप आवडले आहे. पैकीच्या पैकी गुणांची ती मालकीण आहे. या सगळ्यात हिमांशूने तिला खूप साथ दिली. त्याला डान्स काहीसा नवखा असला तरीही तासन तास प्रॅक्टिस करून त्यानेदेखील नाच उत्तम आत्मसात केला आहे. तिच्यावर सगळीकडून होणारा कौतुकाचा वर्षाव आणि त्यातून निर्माण झालेली त्या दोघांबद्दलची जबरदस्त क्रेझ अमेझींग आहे.
महाराष्ट्रातील जनतेने नेहमीच मराठी कलावंतांना भरभरून प्रेम दिलं आहे आणि देत राहतील. त्यात महाष्ट्राची लाडकी लेक आणि जावई देखील त्याला अपवाद नाही. तिची ‘वाजले की बारा’ ही लावणी संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. त्याप्रमाणे ‘नच बलिये’मध्ये केलेले वेगवेगळे डान्स फॉर्मदेखील तितकेच लोकप्रिय झाले आहे. ‘भूलभूलैय्या’ सिनेमातील ‘मेरे ढोलना सून’… या गाण्यावर दिलेला परफॉर्मन्स अतिशय अप्रतिम आणि नेहमी लक्षात राहण्यासारखा होता. असे एकापेक्षा एक नृत्याविष्कार दाखवत बरीच धडपड देखील सहन केली आहे. रिहर्सल करताना अमृता तोंडावर पडली तर एकदा तिच्या पायाला दुखापतही झाली होती. तरीही अमृताने पूर्ण ताकदीने सादरीकरण केलं. तिने घेतलेल्या मेहनतीचं फळ तिला नक्कीच मिळेल आणि ते मिळवून देण्यासाठी महारष्ट्रातील जनता तिच्या पाठीशी उभी राहील, असा सा-यांनाच विश्वास आहे.