‘बायोस्कोप’ला हृदयस्पर्शी काव्यकिनार
चार कवी. त्यांच्या चार कविता. प्रत्येक कवितेचा विषय वेगळा. आशय वेगळा. विचार वेगळा.

चार दिग्दर्शक. त्यांनी चार कवींच्या कविता निवडल्या. त्या कवितेवर आधारित सिनेमात प्रत्येकाने वेगवेगळी गोष्ट सांगितली. त्याचा बाज वेगळा. सांगण्याची रितही वेगळी.
चार कवितांवर चार दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टींतील कलावंत वेगळे. तंत्रज्ञ वेगळे. काळही वेगळा, वेळही वेगळी. सूर वेगळा, ताल वेगळा. स्वतंत्रपणे विणलेल्या या चारही गोष्टी वरवर वेगवेगळ्या वाटत असल्या तरी एक समान धागा त्यात गुंफला आहे. प्रत्येक गोष्टीतील व्यक्तिरेखांचे जगणे, त्यांची सुखदु:ख वेगळी असली तरी, त्यांच्या आयुष्यात आलेल्या सुख-दु:खाच्या जखमांवरच चारही दिग्दर्शकांनी हळुवार फुंकर घातली आहे. या चित्रपटाचे नाव आहे `बायोस्कोप’!
चित्रपटाच्या सुरुवातीला येते सिनेमाचे वेगळेपण अधोरेखित करणारी गुलजार यांची पाठराखण. त्यांच्या खास शैलीतले हे निवेदन चित्रपटाच्या वेगळेपणाची श्रीमंती सांगून जाते. प्रेक्षकांना काहीतरी वेगळे नक्कीच बघायला मिळेल, याचा पाया भक्कमपणे रचते. त्यानंतर एक एक गोष्ट क्रमाक्रमाने येते.
दिल ए नादान


पहिल्यांदा भेटते मिर्जा गालिब यांच्या कवितेवर आधारित `दिल ए नादान’. ही गोष्ट आहे पद्म पुरस्काराने सन्मानित असलेल्या निर्मलादेवी इंदोरी (नीना कुलकर्णी) या लोकप्रिय गायिकेची आणि त्यांच्या मैफलीत सारंगीवादन करणा-या मियाजी (सुहास पळशीकर) यांची. हे दोघेही घरात येतात तेव्हा दरवाजाला एक निरोपाचा कागद असतो. तो निरोप असतो पोस्टमनचा. एक पत्र आले आहे त्याचा. खूप दिवसानंतर दिल्लीवरून आलेल्या या पत्रात काय असेल, याची या दोघांनाही उत्सुकता. त्या उत्सुकतेत प्रेक्षकांनाही गुंतवृन ठेवणारी ही गोष्ट पुढे सरकते आणि त्यांच्या आयुष्यातील असंख्य धाग्यांची उकल करते. आयुष्यातील अनेक मैफली त्यांनी आपल्या आठवणींत साठवून ठेवल्या आहेत, पण आज त्यांच्याकडे कुठल्याही मैफलीचे निमंत्रण नाही, याचे दु:ख आहे. या जखमांची आर्तता सूर, स्वर आणि संवादाच्या ताकदीने पेश केली आहे. त्यामुळे या गोष्टीतली ही जखम एक मैफल म्हणून सिनेरसिकांच्या मनात हक्काची जागा मागणारी ठरते. नीना कुलकर्णी, सुहास पळशीकर या दोघांनीही आपापल्या भूमिकेत अक्षरश: प्राण ओतला आहे. ही मैफल यादगार करणारे या चित्रपटाचे दिग्दर्शक, पटकथा-संवादलेखक गजेंद्र अहिरे यांना पहिला सलाम!
श्रेय नामावली
लघुपट : दिल ए नादान
निर्मिती संस्था : गोल्डन एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि गोडा टॉकीज
दिग्दर्शक : गजेंद्र अहिरे
कथा : गजेंद्र अहिरे
पटकथा/ संवाद : गजेंद्र अहिरे
कवी : मिर्झा गालिब
कॅमेरामन : क्रिश्ना सोरेन
गीतकार : मिर्झा गालिब, गजेंद्र अहिरे
संगीत : नरेंद्र भिडे
गायिका : शुभा जोशी, राजेश दातार, शिल्पा पुणतांबेकर
कलाकार : सुहास पळशीकर (मियाजी) , नीना कुलकर्णी ( निर्मलादेवी इंदोरी), प्रवीण तरडे.
एक होता काऊ


‘बायोस्कोप’मधील दुसरी गोष्ट आहे प्रसिद्ध कवी सौमित्र यांच्या कवितेवर आधारित ‘एक होता काऊ’. माणसाच्या वर्णावर भाष्य करणारी ही तरल गोष्ट आहे. व्यवसायाने मेकॅनिक असलेला स्वप्नील (कुशल बद्रिके) काळ्या वर्णाचा. त्याच्या वर्णावरून सारे त्याला `कावळ्या’ संबोधतात. त्यालाही त्याच्या स्वप्नील नावाचा विसर पडतो. तो एका गो-यागोमटय़ा पाकळी (स्पृहा जोशी)च्या प्रेमात पडलेला. त्याची तिला बघण्याची धावाधाव, तिला भेटण्यासाठीचा अट्टाहास, आटापिटा, लगबग सिनेमाभर पावसात गच्च भिजली आहे. त्याचे वर्णाने काळे असल्याची जखम भळभळून वाहते. त्याच प्रवाहात सिनेमा प्रेक्षकांना वेगवेगळे धक्के देतो. थक्क करतो. आणि त्यांच्या भेटीतील भिजण्यात चिंब करून टाकतो. यात कुशलच्या वाटय़ाला आलेली कावळ्याची भूमिका त्याने अफलातून साकारली आहे. संवादाविना नजरेतून बोलण्याचे कसब या लघुपटात स्पृहा आणि कुशलने प्रचंड ताकदीने दाखवले आहे. यात संपदा जोगळेकर (सौ. जोशी, पाकळीची आई), विद्याधर जोशी (पाकळीचे वडील), अंगद म्हसकर (साहिल) यांनी सहायक कलावंत म्हणून आपापल्या भूमिकांना यथोचित न्याय दिला आहे. सौमित्र यांच्या कवितेवर हा तरल भावस्पर्शी लघुपट आपल्या दिग्दर्शकीय कौशल्याने विजू माने यांनी आखवीरेखीव विणला आहे. विजू माने आणि सतीश लाटकर यांची पटकथा असणा-या या लघुपटाचे संवाद सतीश लाटकर यांचे आहेत. या सा-यांना बायोस्कोपमधील दुस-या कलाकृतीसाठी मानाचा सलाम!
श्रेय नामावली
लघुपट : एक होता काऊ
निर्मिती संस्था : गोल्डन एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि विजू माने प्रोडक्शन प्रा. लि.
दिग्दर्शक : विजू माने
कथा : विजू माने
पटकथा : विजू माने, सतीश लाटकर
संवाद : सतीश लाटकर
कवी : किशोर कदम
कॅमेरामन : शबीर नाईक
गीतकार : संत ज्ञानेश्वर महाराज
संगीत : सोहम पाठक
गायक : सोहम पाठक
कलाकार : कुशल बद्रिके (कावळ्या) , स्पृहा जोशी ( पाकळी ), संपदा जोगळेकर (सौ. जोशी,पाकळीची आई), विद्याधर जोशी (श्री. जोशी, पाकळीचे वडील), अंगद म्हसकर (साहिल).
बैल


बायस्कोपमध्ये तिसरी गोष्ट आहे लोकनाथ यशवंत यांच्या कवितेवर आधारित ‘बैल’. शेतक-यांचे दु:ख, त्यांच्या वेदना, त्यांची होणारी फसवणूक, नापिकी, कर्जबाजारीपणा या आभाळाएवढय़ा दु:खाची जखम या लघुपटात ताकदीने विणली आहे. दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी या लघुपटाची कथा लिहिली असून पटकथा अभय दखणे यांची आहे. संजय पवार यांचे काळीज चिरणारे, मन सुन्न करणारे संवाद या कथेची मोठी ताकद आहे. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे म्हणून शेतक-यांचा मोर्चा मुंबईत येतो. या मोर्चात पंजाबराव सरकटे (मंगेश कदम) तरुण शेतकरीही त्याचा मित्र सुबाना (सागर कारंडे)सह सहभागी होतो. मुंबईतील चकचकीत जगणे पाहण्यासाठी ते एका मॉलमध्ये जातात. तिथे एका कपडय़ाच्या दुकानात पंजाबराव शर्टाची किंमत पाहतो तर ती असते तीन हजार नऊशे नव्व्यानव रुपये. अर्थात चार हजार. तो हबकतो. एका शर्टाची किंमत चार हजार. तो दुकानदाराला विचारणा करतो, एवढी किंमत कशी. तो `शंभरटक्के कॉटन’ असल्याचे सांगतो आणि पंजाबचा माथा सटकतो. १०० किलो वजनाच्या आमच्या कॉटन (कापसाला)ला चार हजार मिळत नाही अन् दुकानदार एका क्विंटलच्या पासंगालाही न पुरणारे शर्ट चार हजाराला विकतो. तो दुकानदाराशी वाद घालतो आणि त्याची तक्रार पोलिसात केली जाते. इथून सुरू होणारी ही गोष्ट पंजाबच्या जगण्याची वेदना सांगायला सुरुवात करते. या गोष्टीचा प्रवास शेतक-यांच्या जगण्याला पडलेल्या असंख्य ठिगळांची कहानी सांगून जाते. हे फाटलेले आयुष्य शिवताना पंजाबची होणारी ओढाताण दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी सुरेख चित्रबद्ध केली आहे. त्यात मंगेश देसाईसह सागर कारंडे, स्मिता तांबे, उदय सबनिस, शेखर बरणे आदी सहकलावंतांनी आपापल्या भूमिकांना यथोचित न्याय दिला आहे. शेवटी `बैल’ काय म्हणतो, हे या लघुपटातच बघितले पाहिजे.
श्रेय नामावली
लघुपट : बैल
निर्मिती संस्था : गोल्डन एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि प्री टू पोस्ट फिल्म्स
दिग्दर्शक : गिरीश मोहिते
कथा : अभय दखणे
पटकथा : गिरीश मोहिते
संवाद : संजय पवार
कवी : लोकनाथ यशवंत
कॅमेरामन : संतोष शिंदे
गीतकार : गुरु ठाकूर
संगीत : अविनाश विश्वजित
गायक : प्रसन्नजीत कोसंबी
कलाकार : मंगेश देसाई (पंजाबराव सरकटे), स्मिता तांबे (शोभा), सागर कारंडे (सुबाना), उदय सबनीस (इन्स्पेक्टर बनसोडे), शेखर बरणे (सावकार).
मित्रा


चौथी गोष्ट आहे संदीप खरे यांच्या कवितेवर विणलेली `मित्रा’. इतरांपेक्षा वेगळ्या असणा-या मुलीच्या आयुष्यात आलेल्या जखमेवर फुंकर घालणारी ही कथा आहे. विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या या कथेत सुमित्रा (वीणा जामकर)च्या भावभावना इतर मुलींसारख्या नाहीत. तिची आवड वेगळी, तिचे आकर्षन वेगळे. त्यामुळे तिच्या जगण्याला विचित्रपणाचे लेबल लागते. ही विचित्रपणाची जखम घेऊन ही गोष्ट पुढे सरकते. कॉलेजमधील विन्या (संदीप खरे) तिच्यावर प्रेम करतो. ते व्यक्त करण्यासाठी पत्रही देतो, पण त्या पत्राला त्याला काय उत्तर मिळते, या प्रश्नाभोवती ही गोष्ट प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी आहे. विणा जामकरसह मृण्मयी देशपांडे या दोघींनीही त्यांच्या भूमिका यादगार केल्या आहेतच. याशिवाय संदीप खरे यांनी अभिनयातही आपले काव्य छान तरलतेने जपले आहे, त्यासाठी या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांना सलाम केलाच पाहिजे.
श्रेय नामावली
लघुपट : मित्रा
निर्मिती संस्था : गोल्डन एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि अथांश कम्युनिकेशन
दिग्दर्शक -: रवि जाधव
कथा : विजय तेंडूलकर
पटकथा/संवाद : रवि जाधव
कवी : संदीप खरे
कॅमेरामन : वासुदेव राणे
गीतकार : संदीप खरे
संगीत : सलिल कुलकर्णी
गायक : सलिल कुलकर्णी, अंजली कुलकर्णी
कलाकार : मृण्मयी देशपांडे (उर्मी), वीणा जामकर (सुमित्रा ), संदीप खरे ( विन्या).
चारही कथा वेगळ्या धाटणीच्या असल्या तरी त्यांतील मानवी सुखदु:खाच्या लहरींमध्ये प्रेक्षकांना खिळवतात. चारही लघुपटाचे चित्रण करणा-या छायालेखकांनी आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे. त्यांना आणि चित्रपटाचे वेगळेपण जपण्यासाठी काम करणा-या टीम ‘बायोस्कोप’मधील प्रत्येकाचे अभिनंदन!
सिनेमा : बायोस्कोप
निर्माता : अभय शेवडे ( गोल्डन एंटरटेनमेंट प्रा.लि)
असोसिएट प्रोड्युसर : संजय धनकवडे, नेहा पेंडसे, परिक्षीत थोरात
सहनिर्माते : मेघना जाधव, गिरीश मोहिते, विजू माने, वृंदा गजेंद्र
प्रस्तुती : शेखर ज्योती (पीएसजे एंटरटेनमेंट)
स्टार : ****