स्टार प्लस वाहिनीवरील प्रतिष्ठित नृत्य स्पर्धेत महाराष्ट्राची लाडकी लेक आणि जावई नंबर वन!
‘वाजले की बारा’सारख्या लावणीमुळे घराघरात पोहचलेली प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने स्टार प्लस वाहिनीवरील प्रतिष्ठीत डान्स रिअॅलिटी शो ‘नच बलिये-७’ची स्पर्धा जिंकली असून, महाराष्ट्राची लाडकी लेक अमृता तिचा पती हिमांशूसह विजयी जोडी म्हणून सन्मानित झाले आहेत.
अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा या दोघांनी ‘नच बलिये-७’मध्ये पहिल्या तीनमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. ‘डान्सिंग क्वीन’ अमृता वेगवेगळ्या टप्प्यांवर पैकीच्या पैकी गुणांची मालकीण ठरली होती.
‘नच बलिये७’मध्ये अमृता आणि हिमांशूने सादर केलेले एकापेक्षा एक डान्स फॉर्म्स परीक्षकांसह प्रेक्षकानाही खूप आवडले आहे. या सगळ्यात हिमांशूने तिला खूप साथ दिली. त्याला डान्स काहीसा नवखा असला तरीही तासन तास प्रॅक्टिस करून त्यानेदेखील नाच उत्तम आत्मसात केला. ‘नच बलिये’मध्ये केलेले वेगवेगळे डान्स फॉर्मदेखील लोकप्रिय झाले आहे. ‘भूलभूलैय्या’ सिनेमातील ‘मेरे ढोलना सून’… या गाण्यावर दिलेला परफॉर्मन्स अतिशय अप्रतिम आणि नेहमी लक्षात राहण्यासारखा होता. असे एकापेक्षा एक नृत्याविष्कार दाखवत बरीच धडपड देखील सहन केली आहे. रिहर्सल करताना अमृता तोंडावर पडली तर एकदा तिच्या पायाला दुखापतही झाली होती. तरीही अमृताने पूर्ण ताकदीने सादरीकरण केलं. तिने घेतलेल्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे.