‘ढोलकी’ वाजली **1/2
कलावंतांचा प्रामाणिकपणा, त्याची सामाजिक बांधिलकी, त्यासाठी समाजातील दृष्ट प्रवृत्तीशी लढण्याची गोष्ट म्हणजे ‘ढोलकी’. या लढाईत कलावंताचा विजय होईस्तोवर वेगवेगळ्या पद्धतीने ‘ढोलकी’वर थाप मारली आहे. त्यावर सिनेरसिकांना ताल धरायला लावला आहे.

ढोलकीची गोष्ट एका गावातील आहे. देवळात फक्त झोप काढणारा म्हणून लाल्या (सिद्धार्थ जाधव)ची गावात ख्याती असते. कामासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्नही करतो, पण कुठेच काम मिळत नाही. पाटलाच्या शिफारशीने त्याला कशीबशी शाळेत शिपायाची नोकरी मिळणार असते, पण त्यासाठी त्याला शिक्षणाचा दाखला मागितला जातो. तो दाखला मिळवण्यासाठी तो घरी येतो. आईकडे नोकरीसाठी दाखल्याची गरज असल्याचे सांगतो. माळ्यावर ठेवलेल्या पेटीत दाखला असल्याचे ती सांगते आणि लाल्या माळ्यावर चढतो. दाखला शोधत असतानाच माळ्यावरून ‘ढोलकी’ खाली पडते. दाखला असलेली पेटी घेऊन खाली येतो आणि त्याची नजर ढोलकीवर जाते. ती तो वाजवायला घेतो आणि तरबेज ढोलकीवादाकाप्रमाणे त्याची बोटं ढोलकीवर अक्षरश: नाचायला लागतात. या ढोलकीच्या या आवाजाने त्याची आई मात्र अस्वस्थ होते. पुढे याच ढोलकीच्या तालावर लाल्या सिनेमाभर रसिकांची करमणूक करतो आणि अखेत एक संदेशही देऊन जातो. ही सारी गंमत पाहण्यासाठी ‘ढोलकी’ पाहावा लागेल.
ही गोष्ट परिणामकारक असली तरी ढोलकीचे चमत्कारिक पद्धतीने वाजण्याची गरज होती का, असा प्रश्न पडू शकतो. करमणूक म्हणून ठिक पण काही गोष्टी टाळल्या असत्या तर चित्रपटाची गोष्ट वास्तव सांगणारी ठरू शकली असती. काही लोककला आणि त्या सादर करणा-यांबद्दल गैरसमज पसरवण्यात आले होते. मुळात हे लोककलावंत समाजातील विकारांवर, वाईट प्रवृत्तीवर हसत खेळत हल्ला करत लोकांचे मनोरंजन करीत होते. त्यांनाच काही स्वार्थी लोक बदनाम कसे करीत होते, याची एक गोष्ट या सिनेमातून दाखवली आहे.
सिद्धार्थ जाधवसह कश्मिरा कुलकर्णी, मानसी नाईक, ज्योती चांदेकर, सयाजी शिंदे, संजय कुलकर्णी, विजय निकम, विलास उजवणे, किशोर चौघुले, जयंत भालेकर अशी मोठी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात सर्वांनी आपापले काम यथोचित बजावले आहे. श्यामसुंदर दंडवते यांनी सिनेमाचे लेखन केले असून, टब्बी-परिख यांनी संगीत दिले आहे. गीतलेखन आशिष कुलकर्णी, अरविंद जगताप यांनी केले आहे. सिनेमातील गाणी आदर्श शिंदे, वैशाली सावंत, बेला शेंडे, अमोल बावडेकर आणि आशिष कुलकर्णी यांनी गायले आहेत. सिनेमटोग्राफी राहुल जाधव यांची आहे.
ढोलकी
निर्मिती : शक्ती पिक्चर्स
निर्माते : शिरीष पट्टन शेट्टी, मदन पोरवाल
दिग्दर्शक : राजू देसाई, विशाल देसाई
कलाकार : सिद्धार्थ जाधव, कश्मिरा कुलकर्णी, मानसी नाईक, ज्योती चांदेकर, सयाजी शिंदे, संजय कुलकर्णी, विजय निकम, विलास उजवणे, किशोर चौघुले, जयंत भालेकर