निर्मल जक्कनवार, सुजाता भांडारकर व शिल्पा रेडीज यांचे रंगलेखन
मुंबईतील तीन समकालीन प्रसिद्ध चित्रकर्ती निर्मल जक्कनवार, सुजाता भांडारकर व शिल्पा रेडीज यांच्या विविध माध्यमातील व शैलीतील चित्रांचे सामूहिक प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २२ सप्टेंबरपासून सुरू झाले असून ते दि. २८ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ हया वेळेत पहायला मिळणार आहे.
रंगलेखिका निर्मल जक्कनवार यांनी अक्रिलिक व चारकोल या माध्यमातून साकारलेल्या निम्न वास्तववादी व काहीशा अमूर्त कलाकृती मुख्यत: जीवनातील वास्तवाचे दर्शन घडवितात. आपल्या कुंचल्यातील फटकारे, योग्य रंगलेपन व रंगसंगती आणि अभिव्यक्तित्व दर्शविताना चित्रकर्ती निर्मल जक्कनवार यांनी आपल्या वेगळ्या शैलीचे व तंत्राचे फार रम्य असे दर्शन चित्रातून घडविले आहे.
रंगलेखिका शिल्पा रेडीज यांनी आपली अनेक चित्रे कॅनव्हासवर तैलरंग वापरुन वास्तववादी शैलीत साकारली आहेत. बनारस, राजस्थान, कर्नाटक वगैरे ठिकाणी अनेक कारणानिमित्त झालेल्या प्रवासादरम्यानच्या आठवणी व त्यांचा मनावर होणारा परिणाम हयातून त्यांनी प्रस्तुत कलाविष्कार सादर केला आहे. चर्चमधील नन, लहान मुले वगैरे चित्रांमधून त्यांनी प्रामुख्याने व्यक्तीचित्रणातून योग्य त्या भावनांचे व मानसिकतेचे दर्शन सादर केले आहे.
रंगलेखिका सुजाता भांडारकर यांनी आपल्या चित्रात पेन व शाई वापरुन साकारलेली चित्रे ग्रामीण परिसरातील जन जीवन व तेथील वास्तूंचा योग्य तो तपशील आणि इतर वैशिष्ट्ये दर्शवितात. जुन्या वास्तु व त्यांची परंपरा, त्यातील रचनात्मक वैशिष्ट्ये व त्यांच्याशी निगडीत अशा आठवणी वगैरे संकल्पनेतून साकारलेली विविध चित्रे रसिकांना एक वेगळीच अनुभूती देतात. आपल्या ग्रामीण परिसरातील समाजजीवन व शैली आणि तेथील रम्य आठवणी दर्शवणारी चित्रकर्ती सुजाता भांडारकर यांची चित्रे बोलकी व वैशिट्यपूर्ण तसेच कलात्मक आहेत.
अलौकिक व अनोखा असा सामूहिक कलाविष्कार सर्व रसिकांना व कलाप्रेमींना नक्कीच आवडेल.