पंडीत कुटुंबीयांच्या शिल्पाकलाकृतींचे २८ सप्टेंबरपासून प्रदर्शन
पद्मश्री ब्रह्मदेव राम पंडीत आणि त्यांच्या कलाकार कुटुंबीयांचा सहभाग असलेलं ‘पोएट्री’ चिनीमातीच्या कलाकृतींचं प्रदर्शन सिमरोझा आर्ट गॅलरी, ७२ भुलाभाई देसाई रोड, ब्रिज कॅन्डी इस्पितळाजवळ, मुंबई येथे दिनांक २८ सप्टेंबरपासून सुरु होणार असून ते १२ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.
मातीकामाला उत्तेजन देणर्या सिमरोझा आर्ट गॅलरीने हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. पद्मश्री ब्रह्मदेव राम पंडीत, अभय पंडीत, देवकी बी. पंडीत, खुशबू पंडीत आणि शैलेश पंडीत या पाच कलाकारांच्या चिनीमातीच्या सहाय्याने साकार झालेल्या विविध कलाकृती या प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत.
पंडीतजी आणि त्यांच्या पत्नी यांनी सुरूवातीच्या कठीण काळात मोठ्या मेहनतीने आणि व्यासंगाने या कलेची जोपासना केली. फिरत्या चाकावर आपल्या प्रतिभेच्या जोरावर अनेक सुंदर कलाकृतींना जन्म दिला. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलांनीही कलेचा हा वारसा उचलला आणि पुढे अगदी छोट्या कलाकृती, टाईल्स असं करत त्यांच्या स्टुडीओमध्ये अनेक शिल्पकृतींची भर घातली.
पंडितजींच्या मातीची भांडी-कुंभारकामविषयक कला क्षेत्रातील कामाची भारत सरकारने दखल घेतली आणि त्यांच्या जीवनभच्या योगदान आणि सर्वोत्कृष्ट कामासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केलं. पद्मश्री ब्रह्मदेव राम पंडित यांना आजवर अनेक पुरस्कार लाभले असून जगभरातील अनेक कलाप्रेमींजवळ त्यांच्या कलाकृती संग्रहीत करून ठेवण्यात आल्या आहेत.
पंडीत कुटुंबीयांची प्रत्येकाची एक स्वतंत्र शैली असूनही त्यांच्या कलाकृती या विचार आणि रचनात्मकतेने जोडल्या गेल्या आहेत. गेली अनेक वर्षं चीनीमातीवर अनेक प्रयोग करून, वेगवेगळ्या प्रक्रीया करून, देखण्या कलाकृती साकार करणार्या या कलावंतांच्या परिवारच्या मनमोहून टाकणार्या शिल्पकृती पाहण्याची संधी मुंबईकर कलारसिकांना चालून आली आहे.
गेली ४४ वर्षं सिमरोझा आर्ट गॅलरी विविध कलाकृतिंची प्रदर्शनं मांडत असून गॅलरीने चित्रकला, छायाचित्रं, शिल्पकला, प्रिंट आणि मातीची भांडी बनवणार्या कलाकारांना सतत प्रोत्साहन देवून त्याना एक व्यासपीठ प्रदन केलं आहे.