गुलजार यांच्या ‘शेकोटी’वर ‘कल्पना एक आविष्कार अनेक’
एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘अस्तित्व’ आयोजित कै. मु.ब.यंदे पुरस्कार ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ २०१५ या एकांकिका स्पर्धेत दिशा थिएटर्स ठाणेची ‘मैं वारी जावां…’ सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली तर फिनिक्स, मुंबईची ‘मन्वंतर’ ही एकांकिका द्वितीय पारितोषिक विजेती ठरली.

यंदा ज्येष्ठ साहित्यिक गुलजार यांनी नात्यांबाबत गहिरा आशय व्यक्त करणारी ‘अलाव‘ ही कविता विषय म्हणून सुचवली असल्यामुळे या स्पर्धेबद्दल एक विशेष उत्सुकता नाट्यवर्तुळात होती, त्याचा प्रत्यय अंतिम फेरीत आला. चित्रपट.मालिका आणि व्यावसायिक रंगभूमीवरच्या कलाकार आणि तंत्रज्ञाचा सहभाग असेलेल्या पाच एकांकिकांची अंतिम फेरी एन.सी.पी.एच्या प्रायोगिक रंगमंचावर सादर झाली. अंतिम फेरीचे परीक्षण प्रतिमा कुलकर्णी, जयंत पवार, वैभव जोशी, विद्याधर पाठारे आणि हृषीकेश जोशी या मान्यवर परीक्षकांनी केले. विशेष म्हणजे गुलजार यांच्या अलाव कवितेचा ‘शेकोटी’ हा मराठी भावानुवाद वैभव जोशी यांनी केला आहे.

लेखकांना महत्व देणारी, नव्या लेखनाला चालना देणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट लेखकाचे पारितोषिक स्वप्निल चव्हाण याला ‘मन्वंतर’ या एकांकिकेसाठी देण्यात आले. प्रेक्षक आणि परीक्षक या दोघांच्याही पसंतीस पात्र ठरलेला ‘मैं वारी जावां’तला प्रसाद दाणी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. ‘ऋणानुंबंध’च्या भाग्यश्री पाणेला अभिनयाचे द्वितीय, ‘मन्वंतर’साठी अजित सावंतला तृतीय, ‘टर्मिनल’साठी प्रज्ञा शास्त्री यांना चतुर्थ तर ‘ऋणानुंबंध’च्या मैथिलि तांबेला पंचम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
‘टर्मिनल’साठी शीतल तळपदे सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकर, ‘ऋणानुंबंध’साठी संदेश जाधव सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार तर ‘मन्वंतर’साठी मल्हार फडके, संतोष वाडेकर सर्वोत्कृष्ट संगीतकार ठरले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक न देण्याचा निर्णय सर्व परीक्षकांच्या वतीने हृषीकेश जोशी यांनी जाहीर केला. स्पर्धेचे संयोजन रवी मिश्रा यांनी केले तर सूत्रसंचालन कीर्तीकुमार नाईक आणि समन्वयक म्हणून सुमित पवार यांनी काम पाहिले.
नाती सहज तुटण्याच्या सध्याच्या काळात नवे मराठी लेखक त्याकडे कसे पाहतात, या दृष्टीने गुलजार यांनी ‘अलाव’ ही कविता सुचवली आणि त्याला स्पर्धकांनी एकोणतीस नव्या एकांकिका लिहून उत्तम प्रतिसाद दिला. अंतिममधल्या पाचही वेगेवगेळ्या नात्यांच्या बंधांचा शोध घेणाऱ्या एकांकिका होत्या.
टर्मिनल

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती निर्मित महेंद्र तेरेदेसाई लिखित डॉ. अनिल बांदिवडेकर दिग्दर्शित ‘टर्मिनल’मध्ये उच्चभ्रू वर्तुळात वावरणारी एक युवती आपल्याला भेटते, म्हटले तर यश, कीर्ती, पैसा, सगळ्याच भौतिक गोष्टी तिला मिळालेल्या आहेत, मात्र असे असले तरी एक सततची अस्वस्थता तिच्यात वर्तनात दिसते, कनेक्टिंग फ्लाईटसाठी एअरपोर्टवर वाट पाहत असताना तिची भेट तिच्या वडिलांशी होते, किंबहुना ही भेट घडवून आणलेली असते. टर्मिनलच्या या लाउंजमध्ये त्या काही तासात बाप–लेकीच्या नात्यातल्या अनेक आठवणी नव्याने तिला भेटतात आणि एक अस्वस्थ वर्तमानाचा अर्थ उलगडत जातो. दीपक करंजीकर आणि प्रज्ञा शास्त्री या मुरब्बी कलावंतांचा अभिनय, शीतल तळपदे यांची भावनाट्य नेमकेपणाने साकारणारी प्रकाश योजना हे या एकांकिकेचे ठळक वैशिष्ट्य होते.
मैं वारी जावा…

दिशा थिएटर्स-ठाणे निर्मित प्रसाद दाणी लिखित प्रसाद सुभाष दिग्दर्शित ‘मैं वारी जावा’ या एकांकिकेचा विषय आजच्या वर्तमानाशी थेट भिडणारा होता. मुंबईतला मढ आयलंडचा परिसर हा मालिका चित्रीकरणासाठी प्रसिद्ध असलेला भाग, या भागात एके रात्री मुंबईबाहेरून आलेल्या एका होतकरू तरुण कलाकाराची, प्रेमभंगाचे दुखः पचवायला समुद्रकिनारी आलेल्या एका उच्च मध्यमवर्गीय तरुणीशी गाठ पडते, चित्रीकरण उशिरा सुटल्यामुळे परतीचे कुठलेच साधन नसलेल्या त्या तरुणाला तिची सोबत करणे भाग पडते. अगदी फुटकळ शब्दातून सुरू झालेला त्यांचा संवाद वर्तमानातल्या प्रेमाचा, त्यातल्या गुंतागुंतीचा, विसंवादाच्या टप्प्यांचा एक बहुआयामी कोन उलगडत, नव्या पिढीला गवसलेला एक वेगळा दृष्टीकोन मांडतो. प्रसाद दाणी आणि चैताली सितूत या दोघांची उत्तम केमिस्ट्री आणि प्रसादची दमदार संवादफेक आणि परफेक्ट टाईमिंग हे या एकांकिकेचे ठळक वैशिष्ट्य होते.
चैतन्य अलवार नात्याचे
नवी मुंबई म्युझिक अॅण्ड ड्रामा सर्कल निर्मित भारती म्हात्रे लिखित विवेक भगत दिग्दर्शित ‘चैतन्य अलवार नात्याचे’ या एकांकिकेत वैशाली पाटील आणि अशोक पालवे या कलावंतानी रहस्यमय नाटकाचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला.
ऋणानुबंध

प्रवेश – मुंबई निर्मित भाग्यश्री पाणे लिखित संदेश जाधव दिग्दर्शित ‘ऋणानुबंध’ ही एकांकिका आपल्या नात्यातल्या विस्कटलेल्या धाग्यांचा अन्वयार्थ लावत केवळ पैसे पाठवण्यापुरते सबंध उरलेल्या दोन टोकांचे आयुष्य जगणाऱ्या माय लेकींची कथा मांडत नात्यांचा एक वेगळाच गहिरा पदर उलगडते.वरवर कितीही रुक्ष वाटले तर आई-मुलीचे नाते न विसरता येणारे, मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या या आईसमोरच्या समस्या वेगळ्याच, पुढे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलीच्या मनात आजवर निर्माण झालेले अनेक प्रश्न, आईची भूमिका, तिचे वागणे या सगळ्यांचे हिशोब आई सोबतच्या एका अपरिहार्य भेटीत मांडला जातो आणि एक विस्मयचकित करणारे नात्यांचे ताणेबाणे उलगडतात. भाग्यश्री पाणे, प्रियांका हांडे, पूर्वा कौशिक, सुहास लाखण आणि बालकलाकार मैथिली तांबे यांचा चोख गोळीबंद अभिनय हे या एकांकिकेचे ठळक वैशिष्ट्य होते. मैथिली तांबेच्या अभिनयातला गोडवा आणि समंजसपणा विशेष कौतुकास्पद होता.
मन्वंतर

फिनिक्स- मुंबई निर्मित स्वप्नील चव्हाण लिखित गिरीश सावंत दिग्दर्शित ‘मन्वंतर’ एकांकिका म्हटले तर आजची आणि पुढच्या काळावरही भाष्य करणारी होती. दिवसेंदिवस तंत्रज्ञानाने स्मार्ट होत असलेल्या जगात, आगामी काळात म्हणजे जवळपास काही दशकांनंतर परस्पर संवाद, प्रेम, शारीरिक जवळीक, विरह, विसंवाद कसा असेल आणि भावना, आठवणी साचल्यावर ते एकमेकासमोर मांडण्याचा प्रवास कसा असेल, हे मांडणारी ही एकांकिका. विज्ञान –तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा मानवी – भावभावनांशी घट्ट संकर झाल्यानंतर काय घडेल याचा थक्क करणारा आविष्कार स्वप्नील चव्हाण या लेखकाने आपल्या प्रतिभाशाली लिखाणातून घडवला. फेसबुकपासून व्हर्चुअल जग कुठे वाटचाल करेल आणि हळूहळू माणसाचे अस्तित्वही व्हर्चुअल होईल याचा त्याने मांडलेला अंदाज अस्वस्थ करणारा होता. आकांक्षा गाडे, अजित सावंत यांचा आशय गडद करणारा टोकदार अभिनय, श्याम चव्हाण यांची समयोचित प्रकाश योजना आणि मल्हार फडके, संतोष वाडेकर यांचे संगीत हे या एकांकिकेचे ठळक वैशिष्ट्य होते.
नाते संबंध सहज तुटण्याच्या काळात त्याकडे नवे लेखक कसे पाहतात, हे गुलजार यांनी स्पर्धकांसमोर ठेवलेले हे आव्हान यंदा या बहुआयामी एकांकिकांमुळे सफल झाले.
निकाल
सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम) : दिशा थिएटर्स, ठाणे : ‘मैं वारी जावां…’
सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) : फिनिक्स, मुंबई : ‘मन्वंतर”
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : कोणीही नाही
सर्वोत्कृष्ट लेखक : स्वप्निल चव्हाण : ‘मन्वंतर’
सर्वोत्कृष्ट अभिनय (प्रथम) : प्रसाद दाणी : ‘मैं वारी जावां’
सर्वोत्कृष्ट अभिनय (द्वितीय) : भाग्यश्री पाणे : ‘ऋणानुंबंध’
सर्वोत्कृष्ट अभिनय (तृतीय) : अजित सावंत : ‘मन्वंतर’
सर्वोत्कृष्ट अभिनय (चतुर्थ) : प्रज्ञा शास्त्री : ‘टर्मिनल’
सर्वोत्कृष्ट अभिनय (पंचम) : मैथिलि तांबे : ‘ऋणानुंबंध’
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकर : शीतल तळपदे : ‘टर्मिनल’
सर्वोत्कृष्ट नेपथय : संदेश जाधव : ‘ऋणानुंबंध’
सर्वोत्कृष्ट संगीत : मल्हार फडके, संतोष वाडेकर : ‘मन्वंतर’
परीक्षक : प्रतिमा कुलकर्णी, जयंत पवार, वैभव जोशी, विद्याधर पाठारे आणि हृषीकेश जोशी.
विजेत्यांचे अभिनंदन!
सहभागी कलावंतांचे आभार
परीक्षक आणि आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद!
-रंगमैत्र