७ आणि ८ नोव्हेंबरला ‘लेखक एक नाट्यछटा अनेक’ची अंतिम फेरी
प्रयोग मालाड आयोजित ‘लेखक एक नाट्यछटा अनेक’ची अंतिम फेरी येत्या ७ आणि ८ नोव्हेंबरला होणार असून त्यात एकूण आठ एकांकिकांची जुगलबंदी प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह येथे रंगणार आहे.
या स्पर्धोत्सवाची प्राथमिक फेरी दिनांक १० व ११ ऑक्टोबर रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह तालीम कक्ष येथे संपन्न झाली. त्यातून आठ संस्थांच्या कलाकृती निवडण्यात आल्याचे प्रमुख संयोजक महेंद्र विचारे यांनी कळविले आहे.
अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या संस्थांच्या एकांकिकांमध्ये बृहनमुंबई महानगरपालिका क्रीडा भवनची ‘अब्द-शब्द’, आरंभ ड्रामा ग्रुपची ‘भास हा माझा’, आकार अॅकॅडेमीची ‘महाभारताचे उत्तररामायण’, नाट्यसंचितची ‘श्रांत-शांत’, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद डोंबिवलीची ‘रावणायन’, राधाकृष्णाई प्रॉडक्शनची ‘अनिकेत’, उन्नती आर्ट्सची ‘आय कन्फेस’ आणि वेध अॅकॅडेमीची ‘होस्ट’ अशा सात कलाकृतींचा समावेश आहे.
‘प्रयोग-मालाड’बद्दल
ज्ञान, सेवा, कला व क्रीडा अशी चौफेर समाजसेवी उपक्रम अंगिकारणारी ‘प्रयोग मालाड’ ही उपनगरातील मान्यवर संस्था आहे. १९७८ साली स्थापन झालेल्या या संस्थेने पथनाट्य, गच्चीनाट्य (टेरेस शो), विविध एकांकिका स्पर्धा, तसेच महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळवून मुंबईतील प्रायोगिक नाट्य चळवळीमध्ये आपला स्वतंत्र व वैशिष्ठ्यपूर्ण ठसा उमटविलेला आहे. या संस्थेच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘लेखक एक, नाट्यछटा अनेक’ या उपक्रमाच्या दुसर्या वर्षी प्रख्यात नाटककार प्र.ल. मयेकर यांच्या एकांकिकांची स्पर्धा आयोजित केली आहे. ऐंशीच्या दशकातील “गाजलेल्या” एकांकिका नवीन रंगकर्मींना अभ्यासता याव्यात, हा मुख्य उद्देश या मागे आहे.
यंदा प्रथितयश लेखक कै. प्र.ल. मयेकर यांच्या नाट्यसंहिता सोडतीद्वारे स्पर्धक संस्थांना देण्यात आल्या होत्या. या स्पर्धोत्सवाची प्राथमिक फेरी दिनांक १० व ११ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह- तालीम कक्ष येथे संपन्न झाली. एकूण १७ संस्था या स्पर्धोत्सवात सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी आठ संस्थांच्या एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.