मिलिंद शिंदे लिखित-अभिनित नवं नाटक
तृप्ती प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्माते अशोक दगडू शिगवण निर्मित आणि मंगेश सातपुते दिग्दर्शित ‘अबीर गुलाल’ या नाटकाचा मुहूर्त नुकताच प्रसिद्ध लेखक संजय पवार यांच्या हस्ते झाला. प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे लिखित व अभिनित हे नाटक येत्या ६ नोव्हेंबर रंगभूमीवर येत असून सध्या या नाटकाची तालीम जोरात सुरू आहे.
‘अबीर गुलाल’ हे अस्तित्ववादासाठी झगडणारं, आत्मकेंद्री, अप्पलपोटया वृत्तीवर गुंफलेलं नाट्य आहे. अस्तित्ववाद हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला वाद आहे मग ते सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक किंवा कोणतेही क्षेत्र असो. अस्तित्ववादाच्या लढाईसाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. नैतिकता अनैतिकता सोडून कधी त्या बाजारात सामील होतो किंवा त्याला सामील व्हावं लागतं. त्या जिवाची जी ससेहोलपट होते ते या नाटकात प्रभावीपणे दाखविण्यात आली आहे.
‘अबीर गुलाल’ या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे ‘नटरंग’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘पारध’, ‘बाबू बेंड बाजा’ या चित्रपटातून तसेच ‘ती फुलराणी’, ‘झुलवा’, ‘कथा अरुणाची’ या नाटकातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे प्रसिद्ध अभिनेता–दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांचं लेखक म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर हे पहिलंच नाटक आहे. अभिनेता म्हणून मिलिंद शिंदे एका वेगळ्या भूमिकेत या नाटकाद्वारे आठ वर्षानी रंगभूमीवर पुनरागमन करीत आहे.
‘वळू’, ‘एक डाव धोबीपछाड’, ‘गुलदस्ता’ या चित्रपटातील अभिनयाने घराघरात पोहोचलेला आणि ‘म्हातारे जमीन पर’, ‘गावात होईल शोभा’ या नाटकाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाने नाट्य रसिकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता – दिग्दर्शक मंगेश सातपुते यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकाचे पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर, नेपथ्य राजन भिसे, प्रकाश योजना शीतल तळपदे, वेशभूषा महेश शेरला, रंगभूषा शरद सावंत यांची असून सुत्रधार गोट्या सावंत हे आहेत. यात मिलिंद शिंदे, पल्लवी वाघ – केळकर या अष्टपैलू कलाकारांसोबत अरुण मोहरे, मनिषा चव्हाण, रमेश रोकडे, ओमकार पनवेलकर, विनय तमखाने, विजय जाधव, दर्शना जनबंधु, यशोधन मावळंकर, निकिता अडसुळ, स्मित कांबळे, सुनिल जाधव यांच्या भुमिका आहेत. चांगली संहिता, उत्तम अभिनेते, नेत्रसुखद नेपथ्य, संगीत आणि दिग्दर्शन या सर्व बाजूंनी परिपूर्ण असं हे नवीन नाटक ‘अबीर गुलाल’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास येत आहे.