नाट्य परिषदेच्या स्पर्धेचे ८ नोव्हेंबरला पारितोषिक वितरण
अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेने नाटय संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या नाटयलेखन स्पर्धेत मुलुंड येथील वसंत प. केतकर यांच्या ‘संगीत समेट` या नाटकाला ११ हजार रुपयाचा व्दितीय पुरस्कार जाहीर झाला आहे. परीक्षकांनी एकमताने प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारची निवड केली नाही, असे नाट्य परिषदेने कळविले आहे.
रविंद्र भगवते यांच्या ‘संगीत डबल लाईफ’ आणि कुमार बडगुजर यांच्या ‘मुखवटा` या नाटकांना ७ हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. सांगलीचे अरविंद लिमये यांच्या ‘एका उत्तराची काहाणी` नाटकाला उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहे.
अ.भा. मराठी नाटय परिषद व्यावसायिक रंगभूमीवरील नाटय निर्मात्यांना नवीन संहिता मिळाव्यात आणि महाराष्ट्रातील लेखकांना नात्यालेखनासाठी उत्तेजन मिळावे, यासाठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नाटयलेखन स्पर्धेचा उपक्रम राबवते. यंदाचं हे ९वे वर्ष आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी ३४ संहिता प्राप्त झाल्या होत्या.
लक्ष्मीनारायण बोल्ली, दत्ता पाटील आणि नितिन नायगावकर या मान्यवरांनी नाटयसंहितांचे परीक्षण केले. पुरस्कार वितरण रविवार, ८ नोव्हेंबर २०१५ रोजी यशवंत नाटयमंदिर, माटुंगा येथे होणा-या अ.भा. मराठी नाटय परिशदेच्या पारितोषिक वितरण सोहळयात होईल.
नाटय परिषदेने संहितापेढी तयार केली आहे. त्यात या संहिताचा समावेश करण्यात येईल. सर्व संहिता लेखकांच्या परवानगीने मिळू शकतील, असे परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी कळविले आहे.