सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणार
जेष्ठ अभिनेते व सामाजिक भान असणारे कलावंत म्हणून संपूर्ण भारतात ओळख असलेल्या सदाशिव अमरापूरकर यांची ३ नोव्हेंबर रोजी प्रथम पुण्यतिथी आहे. या दिवसाचे औचित्य साधून त्यांचा परिवार व जवळचा मित्र परिवार यांनी ‘सदाशिव अमरापूरकर फाऊंडेशन’ची घोषणा केली आहे.
जेष्ठ मानसोपचार तज्ञ व या संस्थेचे विश्वस्त डॉ. आनंद नाडकर्णींनी सांगितले, ‘ कला आणि सामाजिक भान हे सदाशिव अमरापूरकर यांच्या व्यक्तिमत्वाचे दोन मुख्य पैलू मानता येतील. त्यांची आठवण जागृत ठेवायला या दोन पैलूंची सांगड घालता सदाशिव अमरापूरकर फाऊंडेशन या संस्थेची संकल्पना पुढे आली.’
रीमा अमरापूरकर म्हणाल्या, ‘त्यांची स्मृती जागृत ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, ज्या गोष्टीबद्दल त्यांना तळमळ होती, त्या क्षेत्रात काम करत राहणे. या संस्थेचे दोन मुख्य कार्यक्षेत्र असतील – सांस्कृतिक व सामाजिक किंबहुना सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांमार्फत सामाजिक उपक्रमांना सहाय्य करणे व प्रोत्साहन देणे हा संस्थेचा मुख्य उद्धेश आहे. तसेच ग्रामीण भागातील कलाकारांना मग ते लेखक, अभिनेते, दिग्दर्शक किंवा कला क्षेत्राशी निगडित कोणीही असोत, यांच्या कलेला एक व्यासपीठ देणे हा देखील संस्थेचा उद्देश राहील’.
‘संस्थेच्या उपक्रमांचा विस्तार जलद गतीने करण्यासाठी आम्ही सर्व विश्वस्त आणि संचालक प्रयत्नशील असून सदाशिव यांचे विचार आणि त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखविलेली दिशा हे आमचे मुख्य मार्गदर्शक असतील.’ असे संस्थेचे विश्वस्त व अमरापूरकरांचे बंधू राजाभाऊ अमरापूरकर यांनी सांगितले.
या सोबतच श्रीमती सुनंदा अमरापूरकर व डॉ. अनिल अवचट हे या संस्थेचे प्रमुख विश्वस्त आहेत.
संस्थेच्या उपक्रमांबद्दल अधिक माहितीसाठी इमेल द्वारे संपर्क साधता येईल