गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावरील चित्रपट येतोय ११ डिसेंबरला
भारतीय जनता पक्षाचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निःस्वार्थी नेतृत्त्व राष्ट्रीय क्षितिजावर उत्तुंग भरारी घेण्याआधीच काळाच्या पडद्याआड गेले. या नेत्याची `संघर्षयात्रा’ आता रुपेरी पडद्यावर पहावयास मिळणार असून, या चित्रपटाच्या शीर्षकगीताला अमृता फडणवीस यांनी स्वरसाज चढवला आहे. चित्रपटातील गीते सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी ठरतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित `संघर्षयात्रा’ हा सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून येत्या ११ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ओम सिद्धिविनायक मोशन पिक्चर्सच्या सुर्यकांत बाजी, संदीप घुगे, मुकुंद कुलकर्णी आणि राजू बाजी यांनी ‘संघर्षयात्रा’ सिनेमाची निर्मिती केली असून, साकार राऊत या नव्या दमाच्या तरुणाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
या सिनेमाचा म्युझिक आणि टीझर लौंच सोहळा नुकताच मुंबई येथे सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच भारतीय जनता पक्षाच्या अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. मराठी सिनेसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या सिनेमातून गायिका म्हणून पदार्पण केले असून सिनेमाचे शीर्षकगीत हे तिच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे.
मला गाण्याची पहिल्यापासूनच आवड होती परंतु त्यावेळी इतर काही महत्वाच्या गोष्टींमध्ये व्यस्त असल्यामुळे वेळ देणे तितकेसे शक्य झाले नाही. गोपीनाथ मुंडे साहेब हे आपल्या सर्वांचे आयडॉल आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित सिनेमासाठी मला पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली हे मी माझे सौभाग्य समजते. ज्यावेळी मला या गाण्याची विचारणा करण्यात आली त्या दिवसापासूनच मी खूप एक्सायटेड होते. तसेच भविष्यात उत्तम संगीतकर होण्यापेक्षा मला उत्तम गयिका होण्यास अधिक आवडेल असे अमृता देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.
सिनेमाचा टीझर आणि गाणी ऐकल्यावर छोटा असून मोठे होण्याचे स्वप्न पाहणार्या प्रत्येक व्यक्तीला हा सिनेमा उत्तम दिशादर्शक ठरेल तसेच सिनेमाला देण्यात आलेले नाव हे अगदी योग्य आहे. ऊस तोडणीचे काम करणार्याच्या मुलाने साखर कारखाने काढले, तो देशभर फिरला अनेक शैक्षणिक संस्था त्यांनी स्थापन केल्या एक उत्तम नेता म्हणून गोपीनाथ मुंडे साहेब हे आपल्या सर्वांचेच लाडके आहेत. सिनेमाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा असल्याचे अध्यक्ष भाजप मुंबई, आमदार अँड. आशिष शेलार यांनी सांगितले.
साहेबांवर सिनेमा बनवण्याचे ठरले तेव्हा केवळ एकच नाव माझ्या डोळ्यासमोर होते ते म्हणजे अभिनेता शरद केळकर. हा एकच अभिनेता ही भूमिका उत्तमपणे पेलू शकतो याची मला खात्री होती. प्रदीप प्रेमगिरिकर यांनी शरदला जो मेकअप करुन साहेबांचा जो हुबेहूब लूक तयार केला त्याला तोड नसून आम्ही मुद्दामच टीझरमध्ये शरदचा लूक प्रदर्शित न केल्याचे दिग्दर्शक साकार राऊतने सांगितले.
मला खरतर या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली तेव्हा मी जवळजवळ महिनाभर टाळण्याचा प्रयत्न केला पण साकार काही मला सोडत नव्हता. मी हुबेहूब साहेबांसारखा दिसेन असा उत्तम आत्मविश्वास जो दिग्दर्शक साकारला होता तो मला अजिबात नव्हता. परंतु प्रदीजीनी जेव्हा माझा मेकअप करून गेटअप तयार केला तेव्हा माझ्या लक्षात आले की पहिल्यापासून साकारच बरोबर होता आणि मी चुकीचा असे या सिनेमात गोपीनाथ साहेबांची मुख्य भूमिका साकारलेल्या अभिनता शरद केळकर यांनी सांगितले.
‘संघर्षयात्रा’ सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद विराज मुळे, विशाल घार्गे यांनी लिहिले आहेत. सुप्रसिद्ध अभिनेता शरद केळकर, गिरीश परदेशी, ओमकार कर्वे सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे, दीप्ती भागवत आणि प्रीतम कांगणे यांनी या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. शाहीर मोरेश्वर मेश्राम यांनी लिहिलेला पोवाद्याला अनिरुद्ध-अक्षय या जोडीने संगीत दिले असून हा पोवाडा सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे व अनिरुद्ध जोशी यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आला आहे. अमृता देवेद्र फडणवीस यांनी गायलेले शीर्षक गीत हे मंदार चोळकर यांनी लिहिलेले असून संगीत श्रीरंग उर्हेकर यांचे आहे.
सनिश जयराज यांनी कॅमेरामन म्हणून काम पहिले असून अनंत कामत यांनी सिनेमाचे संकलन केले आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जीवनकार्यावरील ‘संघर्षयात्रा’ हा सिनेमा येत्या ११ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.