रोहन सोनार यांच्या छायाचित्रांचे जहांगीरमध्ये प्रदर्शन सुरु
उदयोन्मुख तरुण छायाचित्रकार रोहन वासुदेव सोनार यांनी काढलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या विविध नयनरम्य छायाचित्रांचे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन प्रसिद्ध क्रिकेटपटू अजित आगरकर यांच्या पत्नी शिक्षणतज्ञ फातिमा अजित आगरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी डिएसके लीगलचे सहसंस्थापक सतीश किशनचंदानी, जेबीसीएन इंटरनॅशनल स्कूलच्या प्राध्यापिका गीतिका किशनचंदानी यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन रसिकांना दि. २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान रोज सकाळी ११ ते ७ हया वेळेत पाहायला मिळणार आहे.
रोहन वासूदेव सोनार यांचे शिक्षण मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टस येथे झाले. त्यातील पदव्यूत्तर शिक्षणानंतर त्यांनी केवळ छंद म्हणून फोटोग्राफी सुरू केली. देशातील विविध राज्यातील वास्तुसंग्रहालयांना व अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन त्यांनी अनेक विषयावरील आपले वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे सामूहिक कलाप्रदर्शनातून मांडली व रसिकांची प्रशंसा मिळवली. या दरम्यान अनेक कलाप्रोत्साहक संस्थांकडून त्यांना अनेक परितोषिके व प्रशस्तीपत्रे मिळाली.
रोहन वासूदेव सोनार यांनी आपल्या प्रदर्शनात मुंबई व आसपासच्या परिसरात आढळणार्या काही ऐतिहासिक व प्रेक्षणीय वास्तु, त्यातील रचनात्मक व तांत्रिक वैशिष्ट्य त्याचबरोबर रम्य समुद्रकिनारा, रंगीबेरंगी व अतिशय मनोवेधक आभाळातील ढगांचे रंगीत दृश्य, लोकजीवन व त्यातील मानसिकता आणि त्यांचे काही पैलू वगैरे आपल्या कॅमेर्यात टिपून रसिकांसमोर अनोख्या शैलीत सादर केले आहेत. काही अदृश्य व प्रत्यक्ष न आढळनार्या अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा अतिशय कलात्मकतेने व मनोवेधक असा समावेश आपल्या कामात त्यांनी फार उत्कटतेने केला आहे. त्यांचा हा नयनरम्य आविष्कार खरोखर फार बोलका व मनोवेधक आहे. त्यांची ही नयनरम्य अद्वितीय फोटोग्राफी सर्वांना मनोरंजनासह दृश्यानंद व मानसिक आनंद देईल यात शंका नाही.