महात्मा जोतिबा फुलेंचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर
‘बायोपिक’ चित्रपटांचा स्वतंत्र प्रवाह अलीकडच्या काळात मराठीत तयार झाला असून आत्मचरित्रांवर आधारित चित्रपटांना रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मांदियाळीत आता ‘सत्यशोधक’ हा महात्मा जोतिबा फुलेंच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट येऊ घातला आहे. समता फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर अलीकडेच प्रदर्शित करण्यात आले.
महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्या समाजकार्याला एक योग्य दिशा देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्व स्तरातील शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. ‘सत्यशोधक’च्या माध्यमातून महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी या चरित्रपटाची निर्मिती करण्यात येत असल्याचे लेखक-दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर यांनी यावेळी सांगितले.
अनेक चित्रपटांतून कसदार भूमिका साकारणारे अभिनेता संदीप कुलकर्णी महात्मा जोतिबा फुलेंची भूमिका या चित्रपटात साकारणार आहेत. इतिहासातील या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे जीवनकार्य आणि प्रवास साकारायला मिळणं हा माझ्यासाठी अतिशय आनंददायी अनुभव असल्याचे अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी याप्रसंगी सांगितले. या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी योगेश जाधव यांनी सांभाळली आहे. वेशभूषा संदीप जोशी यांची असून रंगभूषा जितेंद्र म्हात्रे व निशिकांत उजवणे यांची आहे. छायांकनाची जबाबदारी चंद्रकांत मेहेर यांनी तर संकलन व संगीताची जबाबदारी मंदार खरे यांनी सांभाळली आहे.
वैयक्तिक आयुष्यासोबतच सामाजिक जीवनातही अतिशय खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितींवर यशस्वीपणे मात करणा-या महात्मा जोतिबा फुलेंचा जीवनपट प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेल. लवकरच सत्यशोधक चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ होणार आहे.