राज्य नाट्य स्पर्धेसाठी मुंबईच्या तीन कलाकृतींची निवड
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने यंदाच्या ५५व्या राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मुंबईच्या तीनही केंद्रांवरच्या नाटकांमध्ये अटीतटीची स्पर्धा रंगली, त्यात ‘असूरवेद’, ‘धुआँ’, ‘बेबी’ ही नाटके सर्वोत्कृष्ट ठरली असून, ती अंतिम फेरीत पोहचली आहेत.

यंदाच्या राज्य नाट्यस्पर्धेत साहित्य संघ मंदिर, मुंबई केंद्रातून मुंबई महापालिका कर्मचारी कलावंत या संस्थेच्या ‘असूरवेद’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले तर सुनील हरिश्चंद्र सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला. ’असूरवेद’साठीच सुशील इनामदार यांना उत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदक तर राजेश पंडित आणि संदेश बेंद्रे यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना आणि नेपथ्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवडही करण्यात आली आहे.
मुंबई विक्रीकर सांस्कृतिक विभागाच्या ‘वारकरी‘ या नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळाले,या नाटकासाठी दिग्दर्शन (द्वितीय)- सुगत उथळे,प्रकाशयोजना (द्वितीय)- संजय तोडणकर .रंगभूषा (प्रथम)-जयश्री दिंडे यांना गौरवण्यात आले. बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या भिंती या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. या नाटकासाठी प्रसिद्धी राजेश यांना उत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदक जाहीर झाले. स्पर्धेचे परीक्षण रमेश थोरात,श्रीपाद जोशी,सुहास वाळुंजकर यांनी केले तर प्रभाकर वारसे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

यशवंत नाट्य मंदिर,मुंबई केंद्रातून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रमुख कामगार अधिकारी (शहर) या संस्थेच्या ‘बेबी’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले असून बुद्धदास कदम यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (द्वितीय) पारितोषिकाने गौरवण्यात आले. ‘बेबी’साठीच विनोद राणे यांना उत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदक मिळाले तर संजय तोडणकर सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनाकार,संदेश बेंद्रे – सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार ठरले. या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवडही करण्यात आली.
माझगाव डॉक स्पोर्ट्स क्लब कला विभागाच्या ‘आसाचा फेरा’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळाले,या नाटकासाठी तुषार घरत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. याच नाटकासाठी प्रवीण जावीर यांना उत्कृष्ट रंगभूषा पारितोषिकाने गौरवण्यात आले. दि मानवता असोसिएशनच्या ‘एका उत्तराची कहाणी’ या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना (द्वितिय) – निलेश कदम आणि उत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदक – मनाली काळे यांना देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण गणेश वडोदकर, रवींद्र कुलकर्णी, विनिता पिंपळखरे यांनी केले तर उमेश घळसासी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.