१२ फेब्रुवारीला चित्रपट येणार भेटीला
मराठी सिने रसिकांना प्रचंड उत्सुकता असलेल्या ‘पोश्टर गर्ल’चा टीझर लॉँच चित्रपटातल्या कलाकारांबरोबरच दिग्दर्शक समीर पाटील आणि निर्माते पुष्पांक गावडे यांच्या उपस्थितीत पार पडला. चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉँच झाल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांच्या ओठावर बसलेली ‘पोश्टर गर्ल’ची टॅगलाइन ‘संपूर्ण गावासाठी येकच बस’ नंतर आता या चित्रपटातली रूपाली ‘फक्त नाव लक्षात ठेवायचं’ म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
१२ फेब्रुवारीला पोश्टर गर्ल प्रदर्शित होतोय अशी बातमी सर्वत्र पसरल्यापासून या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. प्रेक्षकांच्या प्रतिक्षेचं गोड फळ त्यांना मिळालं झी टॉकीज आयोजित ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’च्या मंचावर, जेव्हा या चित्रपटाच्या कलाकारांनी चित्रपटाच्या अनुशंगाने जाणारं सादरीकरण केलं. मराठीतली अप्सरा सोनाली कुलकर्णी आणि तिचे सहकलाकार जितेंद्र जोशी, ह्रषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, सिध्दार्थ मेनन आणि हेमंत ढोमे हे या सादरीकरणाचा भाग होते. या छोटेखानी सादरीकरणानंतर प्रेक्षकांची उत्कंठा शमवणारा टिझर लॉँच करण्यात आला.
झपाटलेला २ आणि गंगुबाई नॉनमॅट्रीकच्या धमाकेदार यशानंतर आता वायकॉम१८ मोशन पिक्चर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे ‘पोश्टर गर्ल’. सामाजिक व्यंगावर विनोदी अंगाने भाष्य करणारा हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजेचं १२ फेब्रुवारी २०१६ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठीतली ग्लॅम डॉल सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, ह्रषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव आणि सिध्दार्थ मेनन अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे. समाजातल्या संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आहे. एका विलक्षण गावाची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाचं संगीत अमित राज यांचे आहे.
“मराठी चित्रपटांचे प्रकाशक आणि वितरक यांच्या उत्कृष्ट समर्थनामुळे मराठी चित्रपट मोठमोठी शिखरे सर करण्यात यशस्वी होत आहेत. मराठी चित्रपट चाहत्यांनी नेहमीच चांगल्या विषयांना प्राधान्य दिले आहे. अशाचं एका वेगळ्या विषयावर बेतलेला पोश्टर गर्ल आम्ही घेऊन येत असल्याचे,” वायकॉम१८ मोशन पिक्चर्सचे सीओओ, अजित अंधारे यांनी म्हटले आहे.
हिंदी आणि इंग्रजी मनोरंजन विश्वात मैलाचा दगड पार केल्यानंतर वायकॉम१८ आता मराठी सिनेविश्वातही आपली ओळख निर्माण करू इच्छित आहे. लेखक हेमंत ढोमे यांनी लिहिलेली पोश्टर गर्ल मनोरंजनाबरोबरचं सामाजिक समस्यांवर जरूर प्रकाश टाकेल असं म्हणत, या चित्रपटासाठी वायकॉम१८ अत्यंत उत्साही असल्याचे ते म्हणाले.