निसर्गात फिरताना, नवीन पाऊलवाटेवरून चालताना, नवीन मार्ग शोधताना आपण जितके सहज आणि खरे असतो तितके खऱ्या आयुष्याच्या वाटेवरून चालताना आणि एक कलाकार म्हणून जगताना असतो का? प्रत्येक व्यक्ती आणि त्या व्यक्तीतील कलाकाराने विचार करावा असा हा सवाल… निसर्गात सृजनशीलपूर्व भूमी आपणास भेटते. सात्विकतेचा खरा अनुभव हा निसर्ग देऊन जातो. कलाकार म्हणून जगताना “कलासत्त्व” इथे येऊन रुजतं, बहरतं!!
या निसर्गाचा व्यक्तीवर प्रभाव असतो. निसर्गाचे सृजन पाहून व्यक्तीची सृजनात्मक सुपीक भूमी निर्माण होत असते. निसर्गाला जितका जवळून बघा तितका तो खुलत जातो … त्याचे रहस्य जितके जाणून घ्या तितके आपल्या मनातले रहस्य उलगडत जाते … प्रत्येक नवीन पाऊलवाट नवीन आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देऊन जाते….म्हणूनच चैतन्य अभ्यास ही प्रक्रिया मला फार मोलाची वाटते.
या चैतन्य अभ्यासातील काही आठवणी ज्या नाट्यप्रक्रियेत उपयोगी तर आल्याच पण मनात कायमस्वरूपी घर करून गेल्या आणि जगण्याचा आनंद देऊन गेल्या…. मला आठवतात बांबूच्या प्रत्येक पानावरचे ते दवबिंदूंचे थेंब जे स्वतःचे अस्तित्व ठळकपणे मांडतात… आणि त्या झाडाचे सौंदर्यही द्विगुणीत करतात… जेव्हा माझ्या आयुष्यात मी नवीन वाटेवरून चालते त्यावेळी माझे सेन्सेस जास्त जागृत होतात … पंचेंद्रिये एकत्र काम करू लागतात. माझ्या डोळ्यांनी निसर्गाचे सौंदर्य पाहते. नाकाने त्यांचा सुगंध अनुभवते… निसर्गाचा स्पर्श कळतो आणि निसर्गाची unheard बाजू ऐकते… ही प्रक्रिया आपल्यातील कलाकारालाही पंचेंद्रियांद्वारे समृद्ध करते.
आपल्यात निसर्गाला अनुभवण्याची ताकद असताना ही आपण तो कितीदा अनुभवतो? आपण पिकनिकला जातो किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जातो तेव्हा एकमेकांसोबत वावरताना निसर्गाशी किती बोलतो? या दवबिंदूंप्रमाणे आपण का पारदर्शक नसतो? निसर्गात फिरताना, नवीन पाऊलवाटेवरून चालताना, नवीन मार्ग शोधताना आपण जितके सहज आणि खरे असतो तितके खऱ्या आयुष्याच्या वाटेवरून चालताना आणि एक कलाकार म्हणून जगताना असतो का? प्रत्येक व्यक्ती आणि त्या व्यक्तीतील कलाकाराने विचार करावा असा हा सवाल….
शांतीवनात एकदा एका दलदलीच्या, दूषित पाण्याच्या जागी मी अडले… दगडांवर पाय ठेवून पार करून जाताना भीती वाटली, सावरणे, आलर्ट होणे अशा बऱ्याच भावभावना जागृत झाल्या आणि मी बराच वेळ तिथेच अडकले…. आणि माझे सोबती पुढे निघून गेले. इथे कलाकारासाठी आवश्यक तत्व निसर्ग शिकवून गेला की, निगेटिव्हिटीतून लगेच बाहेर पडावं तिथे जास्त काळ टिकून राहिल्यास आपण तिथेच राहतो आणि जग पुढे निघून जातं.
जंगलात कोळ्यांची जाळी खुपदा समोर येतात आपण त्यांना तोडून पुढे निघूनही जातो…एकदा कोळ्याचं जाळं लागलं…त्याला अलगद स्पर्श करून सर म्हणे असंच “अनहद नाद”ही हाताळायचा आहे.

खरंच प्रत्येक कलाकाराने आपली कला अशीच अलवार, अलगद हाताळली तर….. वाह!! कलाकारासमोर सततची येणारी आव्हनेच जास्त!! आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्राप्त परिस्थितीतहि उभं कसं राहायचं, परिस्थितीला सामोरी कसं जायचं, निर्णय घ्यायचा आणि त्याची जबाबदारीही त्यानेच सांभाळायची!! त्या निर्णयाला त्या परिस्तितीतही आपल्या बाजूने वळवणं हेच तर खरं कसब!!
अशाच चैतन्यभ्यासात कधी राखेवर झोपलो आणि नवीन जन्म घेऊन उठलो तर कधी झाडाच्या उंच टोकावर चढून यशाची शिखरे पाहिली… कधी १० ते १५ फीट उंच गवतातून वाट काढत चाललो… वाटली अजगर आणि सापांची भीती तरीही…. तर कधी भर पावसाळ्यात नदी पार केली…. आम्हीच निर्माण केलेली आव्हाने…. सगळंच गूढ गंभीर… परिस्थिती कठीण पण यांत मार्गही शोधले आम्हीच आणि नेगटिव्ह परिस्थीतीला सामोरे जाऊन स्वतःचं आव्हान यशस्वीरित्या पार केलं आम्हीच!! सतत चॅलेंजेस स्वीकारणं हे या प्रक्रियेतून शिकलो!! या मध्ये पूर्ण नाटकाची blocking उभी झाली … बस ती आम्हाला समजणे आवश्यक आहे …
या चैतन्यमय प्रवासात मी आयुष्यातील चढ उतार अनुभवले, त्यांना सामोरी गेले, आयुष्य जगले पण ते कळलेच नाही इतक्या सहज घडले ….
आम्ही पाहिले एकाच ठिकाणी दोनदा जाऊन…. एकदा सकाळी एकदा संध्याकाळी… सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेली आणि दवबिंदूंनी सजलेली ती सकाळ संध्याकाळी कोरडी भासली…. आपल्या आयुष्यासारखी!! एखादी सुंदर अनुभूती घेतल्यानंतर काही काळाने आपणही असेच कोरडे होऊन जातो, नाही का? यावर अश्विनी नांदेडकरचे विचार मनाला खूप भावले…. ती म्हणते, अनुभवांनी समृद्ध होत जाताना कुतुहूल, जिज्ञासा कमी कमी होत जाते… आणि आयुष्य कोरडे कोरडे होत जाते… कारण आपण विचारांना आणि मनालाही कोरडे करत जातो …
पहाटे पहाटे नदीच्या पाण्यातून निघणारे बाष्प ..पाण्याचीच दोन्ही रूप पण पाण्यातून वाफ निघण्यासाठी किती वेळ लागतो.. पाण्याला आपले स्वरूप बदलायला किती वेळ लागतो …fraction of second मग आपल्याला आपले स्वरूप बदलताना का वेळ लागतो.. आपण नेहमी म्हणतो बदल लगेच घडत नाही .. पाणी आणि आपण दोघेही निसर्गातले.. actually बदल हा क्षणाचाच असतो कारण बदल हा विचारांमध्ये घडतो आणि विचार बदलण्यासाठी एकच क्षण पुरेसा असतो….

इथे मला प्रकर्षाने नमूद करायचे आहे, निसर्गात सृजनशीलपूर्व भूमी आपणास भेटते. सात्विकतेचा खरा अनुभव हा निसर्ग देऊन जातो. कलाकार म्हणून जगताना “कलासत्त्व” इथे येऊन रुजतं, बहरतं!! इथे कलाकाराला वेगळी अनुभूती मिळते जी त्या कलाकाराला त्यातील सत्त्व, त्यातील नितळ, निर्मळपणाची अनुभूती देऊन जाते!
एके दिवशी सरांनी एकेकाला बोलावून लांबून रिहर्सल पाहायला सांगितलं. मला लांबून दर्शकाच्या नजरेतून पाहताना जाणवलं की, आम्ही उजेडात आहोत आणि अंधारात कलाकार अगदी सावल्यांसारखे दिसत होते. एक फ्रेम तयार झाली होती. सरांनी दाखवलं, ही फ्रेम तयार करणारा तो लेखक… और यही होता है दिग्दर्शक, जो फ्रेम के बाहर होता है।
आपल्याकडे दिग्दर्शक फ्रेमच्या आत घुसून ऍक्टर बनतो पण खरा दिग्दर्शक हा बाहेरून कलाकाराचं सौंदर्य पाहतो आणि आवश्यक तिथे सुधारणा करतो, बाकी काम कलाकाराने स्वतः करायचं असतं…. आपल्याकडे दिग्दर्शकावर सर्वस्वी अवलंबून राहणारेच जास्त!! आणि वर सांगतात… “I am director‘s artist…!!”
एके दिवशी भरदुपारी आम्ही नाट्यसाधनेत असताना सरांनी येऊन सक्त ताकिद दिली कि २ तासाच्या आत अनहद नाद ची १० पाने सादर करायची आहेत. आम्हाला काही सुचेना कारण नुकतेच २ पानांपर्यंत आम्ही कसेबसे येऊन पोहचलो होतो…. आम्ही प्रत्येकी पाने वाटून घेतली आणि नुसते पाठांतराला लागलो….
२ तासांनी सर आले तरी आमची काही तयारी झालेली नव्हतीच! सरांनी अस्ताव्यस्त झालेल्या आम्हाला एकत्र बोलावलं… आता सर रागावणार या प्रेशरखाली आम्ही असतानाच गोलाकार उभे करून शांत झोपण्यास सांगितलं!! It was Unpredictable!! झोपेतून जागे झालो तेव्हा आपण बराच वेळ झोपलो आणि खूपसा वेळ निघून गेल्यासारखं वाटलं. शांतपणे कुणाशीही न बोलता जागेवर उठून बसलो- झोपलेल्या जागेवर हात फिरवला- तर ती जागा सजीव – गरम वाटली. जणू मी आत्मा आणि ते शरीर! शरीरातील ओझं गायब होऊन आता पिसासारखा अनुभव…. शांत, समाधानी!! त्यानंतर आंघोळ केली जणू आत्माच पवित्र होत होता आणि शरीराची धूळ साफ होत होती. संपूर्ण शारीरिक आणि मानसिक स्वछता झाल्यावर सात्विक सिद्धीचा अनुभव घेतला. खरंतर आम्ही केवळ १५ ते २० मिनिटेच झोपलो होतो पण बराच वेळ झोपलो असं वाटलं…. तो होता पॉवरनॅपचा पॉवरफुल अनुभव!!
त्याचवेळी पाहिलं तर अश्विनी अतिशय ताठ बसलेली- नजर तीक्ष्ण एकाजागी रोखलेली… तिला ती कुठेच दिसेना… आम्ही शांतपणे पुन्हा गोलाकार येऊन बसलो तर तिला समोर बसलेल्या कोमलचे केवळ डोळेच दिसले आणि बाजूची सायली मात्र संपूर्ण दिसतेय… तिची एकाग्रशक्ती वाढली होती! इतक्यात मागे झाडावरील पक्षाने केलेला सूक्ष्म आवाजही तिला ऐकू येत होता आणि नुसतं वळून पाहिलं तर घरटंही नजरेच्या टप्प्यात दिसलं तिला….
अशा वेळेस सरांनी आशूला अनहद नाद मधील “सूक्ष्म अणू रेणू इलेक्ट्रॉन प्रोटॉन…” हा पॅरेग्राफ म्हणायला सांगितला आणि आशुने तो त्या अवस्थेत परफॉर्म केला तेव्हा अद्भुत वातावरण निर्मिती झाली होती!!
या प्रोसेसमध्ये एकाच वेळी समाधानी आणि त्याच वेळी मला मी विस्कटलेली भासत होते. एकाच वेळी उंच आणि त्याचवेळी खूप खोल गेल्याचा अनुभव होत होता….!! हीच सिद्धी आहे!! मला जाणवत होतं हे नाटक सोपं नाही. एकाच वेळी आनंद आणि जबाबदरीने मी गंभीर झाले होते.
सर म्हणाले, जब रुंह अपने आप आकार से निराकार होती है, उसे बायहार्ट कि जरुरत है क्या?…. हे व्हायब्रेशन्सचं नाटक आहे!! अभी तो पुरा माउंट एव्हरेस्ट चढना बाकी है। हा सगळा वेडसरपणा वाटत असेल ना तुम्हाला…. हीच आहे “अनहद नाद” ऐकण्याची प्रक्रिया….!! म्हणजेच आपला “आतला आवाज” ऐकण्याची प्रक्रिया… साधनेतून सिद्धीकडे जाण्याची….
निसर्ग, नाटक आणि मानवी आयुष्याला समग्र रुपात जगण्याची!!