मधुरा जसराज यांनी केले मिलिंद गवळी यांचे कौतुक
अभिनेता मिलिंद गवळी यांच्या अगामी ‘अथांग’ या चित्रपटाचा फर्स्टलुक तसेच संगीत नुकतेच दादर येथील ‘प्लाझा’ चित्रपटगृहात प्रकाशित करण्यात आले. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या जेष्ठ कन्या लेखिका – दिग्दर्शिका मधुरा पंडित जसराज यांच्या शुभ हस्ते चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली.
याच सोहळ्यात “अथांग”च्या संगीताचे प्रकाशन माजी सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीराम गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या नातवाने म्हणजेच पंडित शारंग देव यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटाच्या संगीत आणि ट्रेलर प्रदर्शन सोहळ्यासाठी त्यांची मुलगी प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहिल्याने प्लाझातील संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.

चित्रपती व्ही. शांताराम आपले प्रेरणास्थान असल्याचे मिलिंदने सांगितले. या प्रसंगी सहनिर्माते चंद्रु तिल्वानी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ‘कॅम्पस’, ‘परिवर्तन’, ‘मानो’ या न मानो’ इत्यादी हिंदी मालिकांसोबतच ‘वक्त से पेहले’, ‘चंचल’, ‘हम बच्चे हिंदुस्थान’ के’, ‘वर्तमान’, ‘अनुमती’ इत्यादी हिंदी व ‘आई’, ‘असंच पाहिजे नवं नवं’, ‘देवकी’, ‘मराठा बटालियन’, ‘विठ्ठल विठ्ठल’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ ते आजच्या ‘ठण ठण गोपाळ’ पर्यंत एका पेक्षा एक ग्रामीण – शहरी चित्रपटांद्वारे आपली यशस्वी छाप रसिकांच्या मनात रुजविण्यात यशस्वी झाल्यानंतर अभिनेता मिलिंद गवळी पुन्हा एक वेगळी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. नैसर्गिक अभिनयाची देणगी आणि निरागस निर्मळ चेहरा असं वेगळ कॉम्बिनेशन म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी. त्याचा अगामी “एका मल्टी व्हेंचर्स प्रा. लि.,” निर्मित “अथांग” हा नवा चित्रपट येत्या २९ जानेवारी २०१६ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे अभिनय- निर्मिती -दिग्दर्शन अश्या तिहेरी भूमिकांमध्ये तो पहिल्यांदाच रसिकांसमोर येत आहे.

“अथांग” एक वस्त्र आहे… मानवी मनाच्या आणि नात्याच्या गुंतागुंतीतून विणत गेलेलं…शिल्पा या अनाथ, हुशार चित्रकार मुलीच्या हिम्मतीची कथा “अथांग”मध्ये रेखाटली आहे. एका अनाहूत क्षणी तिला एक गुलाबपुष्प भेट मिळते आणि त्यानंतर तिचे आयुष्य एक नवे वळण घेते….अशी काहीशी संभ्रम तयार करणारी लाईन असलेल्या ह्या चित्रपटाची वीण खूप गुंतागुंतीची असून दिग्दर्शक मिलिंदने ती नाजूक आणि हळुवारपणे सोडविल्याचे पहायला मिळणार आहे.
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत तन्वी हेगडे, स्मिता शेवाळे, मिलिंद गवळी, अमित डोलावत, पूजा नायक, भूषण घाडी, मौसमी हडकर, शीतल गायकवाड, करिष्मा पाताडे(बाल कलाकार) तसेच पाहुणे कलाकार कन्नन अय्यर, प्रफुल सामंत, वंदना मराठे, रवी फलटणकर, सुझान बेर्नेट यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मिलिंदला सहनिर्माते चंद्रु तिल्वानी यांनी सोबत केली असून डीओपी अनिकेत के आहेत.
गीतकार केदार परुळेकर यांच्या शब्दांना प्रसिद्ध संगीतकार पंडित शारंग देव संगीत दिले आहे. अथांगसाठी शीर्षकगीत लहू – माधव या आघाडीच्या संगीतकार जोडीने दिले आहे. कथा प्रोफेसर वसंत हंकारे यांनी लिहिली असून त्यावर पटकथा लेखा त्रैलोक्य यांनी रचली आहे तसेच संवाद लेखा त्रैलोक्य व विनया मंत्री यांचे आहेत.
साऊंड डीझायनिंगचे काम शैलेश सकपाळ यांनी केले असून पार्श्वसंगीत माधव विजय यांनी दिले आहे. संकलन सुबोध नारकर यांचे असून रंगभूषा नित्यानंद वैष्णव यांनी केली आहे. वेशभूषा महेश नारकर यांनी योगदान दिले असून डीआयसाठी कुंदन सिंग यांनी आपले कौशल्य वापरले आहे. सहाय्यक दिग्दर्शन आकाश गुरसले यांनी केले असून कार्यकारी निर्माता शंकर धुरी आहेत. या सोहळ्याचे सूत्रसंचालन निवेदिका स्मिता गव्हाणकर यांनी करून गोडवा वाढविला.