अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ’९६ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन’ ठाणे शाखेच्या विद्यमाने ‘ठाणे’ येथे दिनांक १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०१६ रोजी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या सोहळ्यात विविध करमणुकीचे कार्यक्रम सादर होणार आहेत. या सोहळ्याचा उदघाटन समारंभ शुक्रवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०१६ रोजी सायं. ७.०० वाजता संपन्न होणार असून समारोप सोहळा रविवार, २१ फेब्रुवारी २०१६ रोजी सायं. ५.०० वाजता संपन्न होईल. या नाट्य संमेलनाचे प्रतिनिधी शुल्क रु. २०००/- (दिनांक १९ फेब्रुवारी २०१६ दुपारनंतर ते २१ फेब्रुवारी २०१६ रात्रौपर्यंत निवास, भोजन आणि चहा-नाश्ता) किंवा रु. १४००/- (भोजन आणि चहा नाश्ता) इतके आहे. ९६ व्या नाट्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात मांडावयाचे ठराव सूचक व अनुमोदक (सूचक, अनुमोदक हे परिषदेचे आजीव सदस्य असले पाहिजेत तसेच ते खुल्या अधिवेशनास उपस्थित असणे आवश्यक आहे.) यांच्या स्वाक्षरी व नावांसहित दिनांक १५ फेब्रुवारी २०१६ सायं. ६.०० वाजेपर्यंत नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयात पाठवावेत. त्यानंतर आलेल्या ठरावांची दखल घेतली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी, असे करंजीकर यांनी कळविले आहे.
ठाण्यात १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान नाट्यसंमेलन
स्वागताध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
ठाणे येथे होणारे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ९६वे नाट्य संमेलन १९, २० आणि २१ फेब्रुवारीला होणार असल्याची स्वागताध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, संमेलनाचे समन्वयक विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, स्वागत समिती अध्यक्ष ठाण्याचे महापौर संजय मोरे, नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, नाट्य परिषदेच्या कोषाध्यक्ष लता नार्वेकर, भाऊसाहेब भोइर आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजनासंदर्भात २१ जानेवारीला ठाण्यातील रंगकर्मी, नाट्यसंस्था,शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांची एक सभा ठाणे महानगरपालिका भवनातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केली आहे. सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या संमेलनाचा लोगो सतीश खोत यांनी तयार केला असून, त्याचे अनावरण शुक्रवारी मान्यवरांनी केले.
दरम्यान नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढले असून, या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.