सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका
रंगभूमीवर १०० प्रयोगांचा टप्पा गाठणं कोणत्याही नाटकासाठी अभिमानाची बाब असते. हा मान आता स्टार अभिनेता सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या केदार शिंदे दिगदर्शित ‘गेला उडत’ या नाटकाला मिळत आहे. बेला शिंदे यांच्या थर्डबेल प्रॉडक्शन्स व प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने या नाटकाची निर्मिती केली असून या नाटकाचा १००वा प्रयोग रविवार १५ जानेवारीला दु.४ वाजता शिवाजी मंदिर नाट्यगृहात संपन्न होणार आहे.
“गेला उडत” ही भद्रकाली प्रॉडक्शन्सची ५३वी नाट्यकृती आहे.

मारुती हा तरुण लहानपणापासूनच मारुतीच्या लीलांनी प्रभावित आहे. आपल्यातही मारुतीसारखी शक्ती आली आहे, असं त्याला वाटतं. स्वतःला तो मारुतात्मज म्हणवतो. घरच्या अडचणी आपण लीलया सोडवू अशी त्याची कल्पना असते. त्याला समजून घेता घेता त्याच्या घरच्यांच्या अडचणी वाढतात. शेवटी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. तिथली कौन्सेलर डॉ. सायली त्याला तो सामान्य माणूस असल्याची आणि त्याच्याकडे कुठलीही सुपर नॅचरल पॉवर नसल्याची जाणीव करून देते. सामान्यपणाची जाणीव झालेला मारुती घरच्या अडचणी कशा सोडवतो असं नाटकाचं कथानक आहे.
स्टार अभिनेता सिद्धार्थ जाधवनं मारुती ही धमाल व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच्या अफाट एनर्जीनं रंगमंचावर सतत उत्साहाचं वातावरण असतं. त्याच्यासह अर्चना निपाणकर, सुरभी फडणीस, घनश्याम घोरपडे, गणेश जाधव, अमीर तडवळकर, किरण नेवाळकर, गौरव मोरे, सचिन गावडे, सुमीत सावंत आदींच्या भूमिका आहेत. प्रदीप मुळ्ये यांच नेपथ्य, शितल तळपदे यांची प्रकाश योजना, ओंकार मंगेश दत्तच गीतलेखन, साई-पियुषच संगीत तर सोनिया परचुरे आणि सॅड्रिक डिसूझा यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी या नाटकासाठी उत्तमपणे निभावली आहे.