योगिनी चौक यांचे स्वगत : भाग ९
”विचार, भावना, अश्रू, राग, चीड यांचा सुरेख संगम अनुभवला मी त्या दिवशी. त्या इवलुश्या वेदनेने जाणीव करून दिली, मी आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणं सोडून द्यावं. हे दुखणं जसं मी सहन करू शकतेय तशा माझ्या जबाबदाऱ्याही पार पाडू शकते हा विश्वास निर्माण झाला. आत्मसंवाद! आत्मसाक्षात्कार!! “थिएटर ऑफ रेलेव्हन्स’च्या या अद्भुत प्रक्रियेने शिकवले, कलात्मक नैसर्गिकता अनुभवायला आणि नाटकातील संवाद केवळ नाटकापुरतेच मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात, “आचरणात” आणायला….” योगिनी चौक

आता तुम्ही म्हणाल, शांतीवनातून अचानक मोर्चा इकडे कसा वळवला, तर त्यामागची सुफळ संपूर्ण कथा मांडत आहे.
इथे येण्याचा आमच्या नाट्य प्रक्रियेत कसा फायदाच झाला किंवा मंजुल सरांनी तो कसा करून घेतला यामागची कहाणी अत्यंत रंजक आहे. २९ मे २०१५ रोजी रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे “अनहद नाद” नाटकाचा प्रयोग करण्याचे ठरले. एप्रिल १३ ते मे १३ या महिनाभराच्या रिअर्सलमध्ये आम्ही जे साध्य केले ते १४ मे २०१५ रोजी मंजुल सरांसमोर सादर केले. आमच्या लॉग बुक्स आणि महिनाभराची आमची स्वपरीक्षणे सरांच्या स्वाधीन केली. अगदी परीक्षेचाच फिल येत होता तेव्हा….
गंमत अशी होती की इथे परीक्षकही आम्हीच आणि प्रेक्षकही आम्हीच!! आणि या स्वपरीक्षणात स्वतःलाच प्रगती पुस्तक दिले आम्हीच!!
थिएटर ऑफ रेलेव्हन्स पद्धतीची प्रक्रियाच अशी होती की, स्वअभ्यासातून स्वतःचे गुण आणि कमतरता ओळखून, आपणच आपली चिरफाड करून स्वतःला घडवणं. यात आपल्याच प्रामाणिकपणाची आणि प्रयत्नांची कसोटी लागणार होती. आणि मंजुल सर या प्रक्रियेचे परीक्षण करून फिनिशिंग करणार होते. सुरवातीला “अनहद नाद” नाटकाचा प्रयोग २.३० तास होत होता. मुख्य आनंदाची बाब म्हणजे सगळ्यांचे सगळे डायलॉग्स पाठ होते. कुणालाही कोणताही रोल करावा लागेल असे सुरवातीपासूनच सांगण्यात आले होते. १४ मे २०१५ रोजी “अनहद नाद”चं शिवधनुष्य सरांसमोर आम्ही ७ कलाकारांनी स्वमेहनतीने उचललं खरं! पण तो प्रयोग केवळ पार पडला….समाधान नाही मिळालं…

ज्या शांतीवनात अनहद नाटकाचा जन्म झाला, ज्या शांतीवनाला साक्षी ठेवून अनहद लिहिलं ते शांतीवन मिळणार नाही? आणि नवीन जागेचा शोध सुरु झाला…. धावपळ नुसती!! जागा निसर्गरम्य हवी, ८ जणांची राहण्याची, जेवण्याची, पाण्याची सोय हवी, मुख्य म्हणजे बजेटमध्ये बसणारी जागा हवी सगळ्याच गोष्टी महत्वपूर्ण होत्या!
अखेरीस युसूफ मेहरली सेन्टरची जागा मिळाली आणि आमचा जीव भांड्यात पडला! आधीच प्रयोगाचं टेन्शन, त्यात जागा अनोळखी! पण आमचे मंजुल सर मात्र बिकट परिस्थितीशी दोन हात करायला सदैव तत्पर! इथे आल्या आल्या सरांनी संपूर्ण सेन्टर फिरवून जागेची ओळख करून घेतली आणि कोणताही वेळ न दडवता वर्कशॉपला सुरवात झाली.
विषय होता, Individual to institutional. व्यक्ती ते संस्था ही समग्र प्रक्रिया अवलंबणे. इंस्टिट्यूशन म्हणजे जबाबदारी, वेळेचा योग्य वापर, माझे विचार,माझं तत्व जे मी जबाबदारीने इतरांसमोर मांडते, मांडू शकते. To reach that Institution I have to be clear in vision, aim, well presented, well focused. इतर इंस्टिट्यूशन्समध्ये गेल्यावर आपण “आपली तत्व” न सोडता वागणे गरजेचे. तेथील “तात्विक विचार” घ्यावे, संस्कार नाही. हे समजून घेऊन आवाजाने तालमीला सुरवात झाली.
आमचे संवाद पाठ होते आता अर्थ शोधणे सुरु झाले. तो अर्थ आमच्या व्यवहारिक जीवनाशी जोडून संवाद म्हंटल्यास अधिक जीवंत होऊन येत होता. अभिनेता/अभिनेत्रीचे डोळे बोलतात. त्या डोळ्यांत जीव येतो, जेव्हा विचारांची ताकद परफॉर्म करत असते. विचार डोक्यात तेव्हाच येतो जेव्हा आपली चेतना जागृत असते. आम्ही चेतनेची तालीम पाहिली. सर प्रत्येकाच्या डोळ्यांत पाहून संवाद म्हणत होते. मला तेव्हा सरांचे ते डोळे आठवले जे सुरवातीला अनहद नाद जन्मताना होते. काय विलक्षण तेज होतं त्या डोळ्यांत! आजही तेच डोळे, तीच नजर स्थिरावलेली. मला माझी चेतना जागरूक करायची आहे, हे बळ देणारी!!

चैतन्य अभ्यास प्रक्रियेत पुन्हा नवीन मार्ग, नवीन रस्ता शोधून काढला. पहाडी चढलो. वर आलो तर ३६०° स्टेज दिसला. ठरलं नाटकाची तालीम याच पहाडीवर मोकळ्या हवेत!! सरांनी पहाडीवरून खाली पाहत अनहर्ड ऐकण्यास सांगितले. पाहिले, तर आपण ज्या उंचीवर उभे आहोत ती नाटकाची वैचारिक उंची, जी सरांनी प्रदान केलेली आहे, ती आम्हाला कमवायची आहे आणि अशाप्रकारे या नाटकाच्या वैचारिक उंचीला या पहाडीच्या टोकावर आणून उभे करायचे हा टास्क होता… ही जाणीव झाली आणि पोटात गोळा उभा राहिला. कोणत्याही गोष्टीला वरून तटस्थपणे पाहिले की त्या गोष्टीचे गुण-दोष व्यवस्थित दिसतात.
आम्ही कलाकार वरून पाहतोय रटाळ, त्याच त्याच रुटीनमध्ये अडकलेला समाज.गर्दीतून बाजूला येऊन तटस्थपणे पाहतोय समाजाकडे समाजाचाच एक भाग म्हणून. “अनहद नाद”च्या संवादांतून घेतोय energy कलात्मक साधनेसाठी!!
याच पहाडावर रोज सकाळ संध्याकाळ धावत चढायचो आणि उतरायचो. “निसर्गात नाटकातील कलात्मक जीवनाचा शोध!” त्याच्या अर्थाचा शोध ही वेगळीच प्रक्रिया अनुभवली. “धरातल पर रेंगता जीवन….”आणि “सृजना का माउंट एव्हरेस्ट.” हे संवाद म्हणत त्यांचा अर्थ शोधला. श्वासांचा वापर, वाक्यांचा चढ-उतार, जोर-हळुवारपणा हा पहाडावरून धावत पळत म्हणताना आपोआप येत होता. एकदा तर एक्ससरसाईझ करताना, उड्या मारत असताना मी पडले आणि गुडघा फुटला. मात्र ही अनुभुती माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव ठरला….वेदना सहन करण्याचा!! खरंतर आधी मला जराही खरचटलेलं सहन होत नव्हतं. मला माझ्या पर्सनल आयुष्यातही वेदना, चॅलेंजेस नको वाटायचे आणि अनहद नाद नाटकात एक अक्खा पॅरेग्राफ आहे,

क्रमश: