पु. ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे आयोजन
पु. ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे ५, ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी ‘नाट्यरंग महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात प्रायोगिक,व्यावसायिक,संगीत तसेच बालनाट्य सादर होतील.
महोत्सवाचे उद्घाटन पाच फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या हस्ते होईल.
महोत्सवाची सुरवात राज्यनाट्य स्पर्धेत गौरवलेल्या पारितोषिक विजेत्या ‘शेक्सपियर गेला उडत’ या नाटकाने होईल तर त्याच दिवशी उदयोन्मुख नाटककारांना प्रोत्साहन देण्यासाठी आविष्कार संस्थेने आयोजित केलेल्या ‘नाटककारांच्या शोधात’ या उपक्रमांतर्गत लिहलेले ‘अस्वस्थ समुद्रावर बैल मेलाय !!’ हे नाटक सादर होईल.
सहा फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता मानाची लेखक संघटना आयोजित उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेत गौरवलेली ‘बॉम्ब चिकि चिकि बॉम्ब’ ही पारितोषिकप्राप्त एकांकिका नाट्यरुपात सादर होईल,तर संध्याकाळी साडेसहा वाजता हिंदी रंगभूमीवर विशेष गाजत असलेले रंगबाज संस्थेचे ‘बडे मियाँ दिवाने’ हे हिंदी नाटक सादर होईल.
रविवार सात फेब्रुवारीची सकाळ ‘मिकी माऊस छोट्या भीमची धम्माल’ आणि ‘फुग्यातला राक्षस’ या राजू तुलालवार यांच्या विशेष गाजलेल्या बालनाट्यांनी रंगणार आहे.सकाळी दहा वाजता हे प्रयोग सुरु होतील. दुपारी बारा वाजता राज्य बाल नाट्य स्पर्धेत प्रथम आलेले ‘डराव डराव’ हे नाटक प्रेक्षकांना पाहता येईल.
बऱ्याच कालावधीपासून संगीत नाटक महोत्सवात दाखवावे अशी प्रेक्षकांकडून होत असलेली मागणी विचारात घेऊन ‘संगीत जय जय गौरी शंकर’ हे रसिक प्रेक्षकांचे अमाप प्रेम लाभलेल नाटक संध्याकाळी चार वाजता सादर होईल. महोत्सवाची सांगता झी गौरव सर्वोत्कुष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणाऱ्या ‘गोष्ट एका शाळेची’ या नाटकाने होईल.
या सर्व नाटकांचे प्रयोग विनामुल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल.तेव्हा जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने केले आहे.