रंगलेखक विनायक भोईर यांनी साकारली वनांची अंत:स्पंदने
‘वृक्ष विश्वाचे मूलाधार’ अशी भावना असलेल्या प्रसिद्ध रंगलेखक विनायक भोईर यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये २९ मार्चपासून सुरु होत असून ते ४ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.
‘वनांतरे – वनांची अंत:स्पंदने या शीर्षकाप्रमाणे रंगलेखक विनायक भोईर यांची ही चित्रे झाडांच्या मनीचे गूज आपल्यापर्यंत पोहोचवतात. झाडांविना सृष्टीची कल्पनाच आपण करू शकत नाही. मात्र आपली आजची सारी वाटचाल प्रगतीच्या नावाखाली सर्वनाशाकडे नेणारी चालली आहे. हा सल मनी घेऊन जगणारांपैकी हा चित्रकार आहे. त्यांनी आपल्या प्रदर्शनात कॅनव्हासवर तैलरंगात रंगवलेली ३० / ३५ लहान मोठी ‘तरुचित्रे’ ही परंपरागत मूर्त शैलीत साकारली आहेत. जी या हळुवार भावना व्यक्त करायला समर्थ ठरते. रंगांचे लेपन आणि कुंचल्याचा मुक्त जोरकस वापर हा चित्रकाराचा अनेक वर्षाचा अनुभव आणि माध्यमावरील प्रभुत्व दर्शवितो.

भोईर यांचा निसर्गाच्या ओढीमुळे आणि अनेक वर्षांच्या पद भ्रमणाच्या छंदातून सह्याद्रीमधील अपवादानेच उरलेल्या वृक्षराजींशी आणि गोव्याच्या परिसरात असणा-या झाडा झुडपांशी संबंध जुळला. त्यातून त्यांच्या मनावर कधीच पुसले न जाणारे जे संस्कार बिंबले, तेच त्यांनी या चित्रांमधून आपल्यासमोर मांडले आहेत.
ही चित्रे पाहताना आपण त्या जादुई हिरवाईच्या दुनियेत हरवून जातो. गूढ धुके आणि पानांतून पाझरणारा दिव्य प्रकाश यांचा जणू प्रत्यक्ष अनुभवच घेतो. कधी वृक्षाची गगनस्पर्शी भव्यता तर कधी लयबद्ध आकारांतून निर्माण होणारी नृत्यमय रचना; कधी नुसतीच स्तब्ध प्रतिबिंबे आपल्याला खिळवून ठेवतात. चित्रकाराच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच ही निव्वळ निसर्गचित्रे नसून वृक्षांच्या अंत:करणातील संवेदना जाणण्याचा हा एक मनापासून प्रयत्न आहे.