१ एप्रिलला चित्रपटगृहात शोधू या!
मकरंद अनासपुरेची हटके भूमिका असलेला ‘रंगा पतंगा’ या सिनेमाची भव्य चर्चा सुरु आहे. हा ‘रंगा पतंगा’ कोण हे येत्या १ एप्रिलला चित्रपटगृहात शोधू या.
हरवलेल्या “रंगा पतंगा’चा शोध घेण्याच्या वनलाईनवर सामाजिक, सांस्कृतिक आणि शेतक-यांच्या दु:खावरही भाष्य करणारा हा सिनेमा असून, तो क्लास आणि मास पाब्लीकलाही गुंतवणारा असल्याचे बोलले जात आहे.

डॉ. जवाहर मुथा यांच्या हस्ते म्युझिक लाँच करण्यात आले. चित्रपटाचे पटकथा-संवादलेखक व दिग्दर्शक प्रसाद नामजोशी, निर्माता-सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे, अभिनेता मकरंद अनासपूरे, संदीप पाठक, भारत गणेशपूरे, संगीतकार कौशल इनामदार, गायक आदर्श शिंदे, प्रस्तुतकर्ता बिपीन शहा, संकलक सागर वंजारी, अभिनेत्री गौरी कोंगे, हार्दिक जोशी, उमेश जगताप, तेजपाल वाघ, कथालेखक चिन्मय पाटणकर आदी या वेळी उपस्थित होते. चित्रपटाचा ट्रेलरही या वेळी दाखवण्यात आला.
‘आतापर्यंतच्या संगीत कारकिर्दीत रंगा पतंगा हा माझ्यासाठी खूप आव्हानात्मक चित्रपट आहे. ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार यांची रचना गझल आणि कव्वाली या दोन प्रकारात संगीतबद्ध करायची होती. एक चाल केल्यावर ती मनातून काढून पुन्हा नवीन चाल करणं खूप अवघड होतं. जवळपास चार महिने या गाण्यांवर काम करत होतो. एकच गाणं दोन वेगळ्या संगीत प्रकारांमध्ये वापरण्याचा वेगळा प्रयोग या निमित्ताने झाला आहे,’ असं कौशल इनामदार यांनी सांगितलं.
‘सध्या चित्रपटांत उडत्या चालीची गाणी गात असताना प्रथमच गझल गाण्याची संधी रंगा पतंगा या चित्रपटामुळे मिळाली. पार्श्वगायक होण्यापूर्वी मी गझलच गायचो. मात्र, गेल्या काही वर्षांत गझल गाण्याची संधीच मिळाली नाही. कौशल इनामदार यांनी मी गझल गातो, लक्षात ठेवून मला या चित्रपटात गाणं दिलं याचा आनंद वाटतो. पंधरा दिवस त़यारी करून आम्ही गझलचं रेकॉर्डिंग केलं. एकच गाणं दोन प्रकारांत गायला मिळणं हा गायक म्हणून पहिला अनुभव आहे,’ असं आदर्शनं सांगितलं. सर्वांच्या आग्रहाखातर त्यानं चित्रपटातील गझल सादर केली. त्याला सर्वांकडून भरभरून दाद मिळाली.
‘कोणताही चित्रपट करताना केवळ सिनेमॅटोग्राफर म्हणून माझा त्यात सहभाग नसतो. त्या चित्रपटासाठी भावनिक आणि मानसिक गुंतवणूक करतो. आजपर्यंत उत्तम आशयविषय असलेल्या चित्रपटांसाठी काम केलं. मात्र, स्वतंत्रपणे काहीतरी करावं हा विचार मनात होता. त्यासाठी स्वतःच निर्मिती करणं हा पर्याय होता. मराठी चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या उत्तम कामगिरी करत असताना उत्तम विषय प्रेक्षकांपुढे आणणंही आवश्यक आहे. थोडा व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून आशयघन चित्रपट करण्यासाठी निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ‘रंगा पतंगा’ करताना मकरंद अनासपूरे, संदीप पाठक, कौशल इनामदार यांच्यासारखे अनुभवी आणि लोकप्रिय कलाकारांची निवड केली, असं निर्माता अमोल गोळे म्हणाला.
सध्याच्या परिस्थितीचं नेमक्या पद्धतीनं चित्रण ‘रंगा पतंगा’नं केलं आहे. मार्मिक विनोदातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत वास्तव दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही हा चित्रपट नक्कीच भावेल, असा विश्वास बिपीन शहा यांनी व्यक्त केला.